
मुंबई | 27 ऑक्टोबर 2023 : मुंबईत सध्या गुन्ह्यांचं सत्र वाढलं असून दररोज काही ना काही गुन्ह्याच्या घटना कानावर (crime news) पडतच असतात. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे नागरीक धास्तावले असून गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात येत आहे. याचदरम्यान मुंबईतील बोरिवली येथे एक धक्कादायक चोरीची (robbery) घटना घडल्याचेही समोर आले आहे.
बोरिवली येथील एका रेस्टॉरंटच्या मालकाचे लाखो रुपये लुटल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी अज्ञात टकाटक गँगच्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेस्टॉरंट मालकाने दाखल केलेल्या तक्रानीनंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले असून त्या चाही आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरालाल पोपट (वय 37) असे तक्रारदार इसमाचे नाव आहे. हिरालाल यांचे बोरिवलीमध्ये फ्लेमिंगो टेबल हॉटेल नावाचे एक रेस्टॉरंट आहे. हिरालाल हे दर महिन्याच्या २० तारखेच्या आसपास हॉटेलचे मासिक उत्पन्न, गल्ला मोजतात आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना पगार देऊन उर्वरित रक्कम योगी नगर येथील ICICI बँकेच्या अकाऊंटमध्ये डिपॉझिट करतात.
दरवेळेप्रमाणे, या महिन्यातही कर्मचाऱ्यांचे पगार देऊन झाल्यानंतर हिरालाल हे 10 लाख रुपयांची कॅश बँकेत भरण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यातच त्यांना काही कामासाठी मधेच थांबावे लागले. त्याचवेळी किरकोळ दुरुस्तीसाठी त्यांची ड्रायव्हरने लिंक रोड येथील बंजारा शॉप येथे नेली. गॅरेजजवळ पोहोचल्यानंतर एका व्यक्तीने कारजवळ येऊन दरवाजा वाजवला आणि तुमच्या खिशातून पैसे खाली पडले आहेत, असं त्याने ड्रायव्हरला सांगितलं.
मागच्या सीटवरून चोरली पैशांची बॅग
त्यानंतर ड्रायव्हर त्याच व्यक्तीशी बोलत असातानाच आणखी दोघे जण कारजवळ आले. त्यापैकी एका गॅरेजमधील मेकॅनिकला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि दुसऱ्या व्यक्तीने त्या कारच्या मागच्या सीटवर ठेवलेली पैशांची बॅग उचलली आणि तो तिथून निसटला. चोरीचा हा संपूर्ण प्रकार तेथे लावलेल्या एका सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. चोरीचा हा प्रकार लक्षात येताच, ड्रायव्हरने हिरालाल यांना तातडीने याबाबत कळवले. चोरट्यांनी १० लाख रुपयांची रक्कम लांबवल्यानंतर हिरालाल यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास करताना पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीने त्या आरोपींचा शोध घेत आहेत.