पवित्र आश्रमातच इज्जतीवर हात टाकला, व्हिडीओ बनवला, तवावाला बाबावर गुन्हा; शोध सुरू

| Updated on: Jan 28, 2024 | 4:59 PM

अमरावती जिल्हा हा संतांचा जिल्हा आहे. संत गुलाबराव महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराजांसारखे अनेक नामवंत संत या जिल्ह्याने महाराष्ट्राला दिले आहेत. तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेतून समाजाला जागृत केले, तर गाडगेबाबांनी आपल्या भजनातून अंधश्रद्धेवर प्रहार केला. त्याच तुकडोजी महाराजांच्या आणि गाडगे महाराजांच्या जिल्ह्यातील एका बाबाच्या या घाणेरड्या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे.

पवित्र आश्रमातच इज्जतीवर हात टाकला, व्हिडीओ बनवला, तवावाला बाबावर गुन्हा; शोध सुरू
sunil kawalkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमरावती | 28 जानेवारी 2024 : गरम तव्यावर बसण्याचा दावा करणारा गुरुदास बाबा ऊर्फ सुनील कावलकर सध्या एका प्रकरणाने चांगलाच चर्चेत आला आहे. एका महिलेच्या असह्यतेचा त्याने फायदा घेतल्याचं समोर आलं आहे. महिलेला आश्रमात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा या बाबावर आरोप आहे. या बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण उजेडात आल्यानंतर तवावाला बाबा गायब झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, या प्रकरणाने अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे.

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मार्डीच्या आश्रमातील गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील महिला भाविकेचे शोषण करून व्हिडिओ बनवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या महिलेचा नवरा आजारी असतो. तिच्या नवऱ्याचा आजार बरा करण्यासाठी तव्यावाला बाबाने तिला मध्यप्रदेशातून अमरावतीच्या आश्रमात राहायला बोलावलं. या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा अश्लील व्हिडीओ काढला असा आरोप या महिलेने केला आहे.

या प्रकरणी अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार गुरुदास बाबाला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. काही महिन्यापूर्वी याच बाबाचा तापत्या ताव्यावर बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे हा बाबा अचानक चर्चेत आला होता.

कोण आहे बाबा?

पेटत्या चुलीवर ठेवलेल्या मोठ्या तपत्या तावीवर बसलेल्या या बाबाच नाव आहे श्री संत सचिदानंद गुरुदास बाबा, या बाबाच मूळ नाव आहे सुनील जानराव कावलकर. हा बाबा 47 वर्षांचा आहे. या गुरुदास बाबाचा जन्म हा अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी गावचा असून याच गावात या बाबाचा गेल्या अनेक वर्षांपासून दरबार भरत आहे. या दरबारात हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. गुरुवार, शनिवार आणि अमावस्या, पौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर या बाबाचा दरबार भरतो.

याच दरबारात मला कधी कधी दैवी शक्ती प्राप्त होते. पण या दरबारात कुठेच अंधश्रद्धा नाही. मी गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांच्या विचारावर चालतो, लोकांची सेवा करतो, गौररक्षण चालवतो त्यामुळे कुठेच अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा या बाबाने केला होता. दैवी शक्ती प्राप्त झाल्यानंतर भान राहत नाही त्यातूनच तव्यावर बसलो होतो असा दावाही या बाबाने केला होता

दुसरीकडे या बाबाने दैवी शक्ती प्राप्त होत असलेल्या दाव्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने थेट आव्हान दिले होते. महाराजामध्ये दैवी शक्ती आहे तर या बाबाने पुन्हा तव्यावर बसून दाखवावे. त्यांना आम्ही 30 लाख रुपयांचे बक्षीस देऊ. नाही तर त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी अंनिसने केली होती. चुलीवर बसलेल्या बाबाचा हा व्हिडिओ साधारणत: एक वर्षापूर्वीचा होता. हा व्हिडिओ तेव्हा समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर बाबा प्रकाशझोतात आला होता.

या बाबाच्या दरबारात प्रत्येक सण उत्सव साजरा होत असतो. या सण उत्सवात भाविकांचीही मोठी गर्दी असते. महाशिवरात्रीला सात दिवस सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या सप्ताहात मोठ्या प्रमाणावर भाविक इथे येत असतात. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनही ॲक्शन मोडवर आलं होतं. या व्हिडिओची सत्यता पोलिसांनी तपासली होती.