एका रात्री पाच जणांना संपवलं, न्यायालयासमोर व्यक्त केली ही इच्छा, आरोपीला ठोठावली मोठी शिक्षा

| Updated on: Apr 15, 2023 | 3:18 PM

यात सरकारी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी, हे पटवून दिलं. तर बचावपक्षाने फाशीची दिली जाऊ नये, यासाठी युक्तिवाद केला.

एका रात्री पाच जणांना संपवलं, न्यायालयासमोर व्यक्त केली ही इच्छा, आरोपीला ठोठावली मोठी शिक्षा
Follow us on

नागपूर : नागपुरात पाच वर्षांपूर्वी मोठं हत्याकांड घडलं. यात आरोपीने पाच जणांना रात्री संपवलं. त्यात आरोपीने बहीण, जावई, भाचीसह पाच जणांना संपवलं. हे दुर्मीळातील दुर्मीळ प्रकरण आहे. त्यामुळे आरोपीला कोणती शिक्षा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जिल्हा न्यायाधीश आर. एस. पावसकर यांच्यापुढे दोन्ही पक्षांनी फाशीवर युक्तिवाद केला. यात सरकारी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी, हे पटवून दिलं. तर बचावपक्षाने फाशीची दिली जाऊ नये, यासाठी युक्तिवाद केला.

रात्री पाच जणांना संपवलं होतं

नागपुरातील बहुचर्चित पवनकर हत्याकांडातील आरोपी विवेक गुलाबराव पालटकर याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. आरोपीने बहीण, जावई, भाचीसह एका रात्री पाच जणांची हत्या केली होती. नागपूर जिल्हा न्यायालयाने विवेक गुलाबराव पालटकर याला फाशीची शिक्षा दिली.

पाच जणांचं आयुष्य संपविणाऱ्या विवेक गुलाबराव पालटकरने न्यायालयापुढे स्वत:चे आयुष्य संपविण्याची मागणी केली होती. ‘मला त्वरित संपवा, मला फाशी द्या, आता मला जगण्याची इच्छा नाही’, असे मत त्याने न्यायालयासमोर व्यक्त केले होते. १० जून २०१८ रोजी रात्री ९.३० ते १० वाजतादरम्यान हत्याकांड घडलं होतं.

आरोपी म्हणाला जगण्याची इच्छा नाही

न्यायालयाने आरोपीला फाशी द्यावी की नाही, यावर मत जाणून घेतले. तेव्हा आरोपीने मला जगण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी आज न्यायालयानं निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अभय जिचकार यांनी कामकाज पाहिले. त्यांना अॅड. मोहम्मद अतिक यांनी सहकार्य केलं.

घटना नेमकी काय होती

कमलाकर पवनकर या मृत व्यक्तीचा आरोपी विवेक पालटकर हा मेहुणा होता. कमलाकर आणि विवेक यांच्यात पैसा आणि हिश्यावरून वाद झाला. १० जून रोजी विवेक हा कमलाकरच्या घरी मुक्कामाने आला. सर्वजण झोपले असताना विवेकने रात्री तीनच्या सुमारास लोखंडी सब्बलने घरातील पाच जणांच्या डोक्यावर प्रहार करून संपवलं.

मृतांमध्ये कमलाकर पवनकर (वय ४८), त्यांच्या पत्नी अर्चना (वय ४५), आई मिराबाई पवनकर (वय ७३), मुलगी वेदांती कमलाकर पवनकर (वय १२), भाचा कृष्णा विवेक पालटकर (वय ५) यांचा समावेश होता. यातून विवेकची मुलगी वैष्णवी पालटकर (वय ७ वर्षे), मिताली कमलाकर पवनकर (वय ९ वर्षे) या दोघी बचावल्या होत्या.