Nashik Crime : पहिला सोडून दुसरा केला, दुसऱ्याने तिचा काटा काढला, कारण काय?

हल्ली लिव्ह इन रिलेशनशीपचे फॅड वाढले आहे. मात्र या नात्यातून छोट्या छोट्या कारणातून हत्येच्या घटनाही वाढल्या आहेत.

Nashik Crime : पहिला सोडून दुसरा केला, दुसऱ्याने तिचा काटा काढला, कारण काय?
किरकोळ वादातून लिव्ह पार्टनरने महिलेला संपवले
Image Credit source: TV9
| Updated on: Aug 18, 2023 | 1:43 PM

चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी नाशिक / 18 ऑगस्ट 2023 : पहिल्या पतीशी पटत नव्हते. म्हणून त्याला सोडून आली आणि दुसऱ्या पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. पण मुलावरुन वाद झाला आणि लिव्ह इन पार्टनरने थेट तिची हत्याच केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. श्याम अशोक पवार असे अटक आरोपीचे नाव आहे. तर आरती श्याम पवार असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे वाढत्या हत्या रोखण्यासाठी ठोस पावले उलचण्याची आवश्यकता आहे.

मुलाला चापट मारल्याने दोघांमध्ये भांडण

आरती पवार हिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र पती-पत्नीचे पटत नसल्याने तिचा पती तिला सोडून गेला होता. यादरम्यान तिची श्याम पवारसोबत ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. मग दोघेही आरतीच्या मुलांसह एकत्र राहू लागले. मात्र काही दिवसांनी आरती आणि श्याममध्येही खटके उडत होते. यातच श्यामने आरतीच्या मुलाला काही कारणातून चापट मारली. यामुळे आरतीने त्याला जाब विचारला.

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

यावरुन दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. यात संतापाच्या भरात आरोपीने किचनमधील सुरी घेऊन आरतीच्या पाठीत खुपसली. त्यानंतर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सावकारवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.