Nashik | बायकोने फारकत शब्द उच्चारताच नवऱ्याची दुथडी भरलेल्या गंगेत उडी…

| Updated on: Dec 28, 2021 | 9:37 AM

दीपकने उडी मारल्याचे पाहताच बायको कोमलने आरडा-ओरडा केला. नागरिक जमले. त्यातील काही जागरूक नागरिकांनी पंचवटी अग्निशमन केंद्राला ही माहिती दिली.

Nashik | बायकोने फारकत शब्द उच्चारताच नवऱ्याची दुथडी भरलेल्या गंगेत उडी...
नाशिकमध्ये बायको फारकत घेणार म्हणून नवऱ्याने गोदावरीत उडी मारली.
Follow us on

नाशिकः बायको फारकत घेणार म्हणून नवऱ्याने गंगेत उडी मारल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. अग्निशमन दलाने रात्री उशिरापर्यंत या नवऱ्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. शेवटी अंधारामुळे शोध मोहीम थांबवावी लागली. दीपक अशोक परदेशी (वय 30, रा. लेखानगर, सिडको) असे संबंधिताचे नाव आहे. याप्रकरणी दीपकची पत्नी कोमलने मालेगाव स्टँड पोलीस चौकीत जावून घडला प्रकार सांगितला.

प्रकरण नेमके काय?

दीपक परदेशी आणि कोमल परदेशी हे दोघेही नवरा-बायको. मात्र, दोघांत पटत नव्हते. सारखी भांडणे व्हायची. त्यामुळे फारकत घेण्यावरून त्यांच्यात न्यायालयात वाद सुरू होते. कोमल घटस्फोट घेण्यावर ठाम होते. त्यामुळे दीपक परदेशी यांनी तुझ्याशी बोलायचे आहे म्हणून बायकोला नाशिकमधल्या रामवाडी पुलावर आणले. येथेही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद विकोपाला गेल्याने दीपकने शेवटी रागारागात गोदावरी नदीपात्रात उडी मारली.

रात्रीपर्यंत शोधकार्य…

दीपकने उडी मारल्याचे पाहताच बायको कोमलने आरडा-ओरडा केला. नागरिक जमले. त्यातील काही जागरूक नागरिकांनी पंचवटी अग्निशमन केंद्राला ही माहिती दिली. पथकाने तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. बोटीच्या सहाय्याने दीपक परदेशी यांचा शोध सुरू केला. शेवटी अंधार पडल्यामुळे हे शोधकार्य थांबण्यात आले. याप्रकरणी कोमल परदेशी यांनी मालेगाव स्टँड पोलीस चौकीत जाऊन सारा प्रकार सांगितला.

दीपकला पोहता येते…

कोमल परदेशी आणि दीपक परदेशी यांच्या मित्रांनी दीपकला पोहता येत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे दीपकने रागाच्या भरात गोदापात्रात उडी मारले असेल. कुठल्याही तरी बाजूने ते पोहत जाऊन बाहेर पडले असतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, सध्या गोदापात्रात पाणी भरपूर आहे. उगीच धोका नको म्हणून अग्निशमन दलाच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत हा परिसर पिंजून काढला. रामवाडी पूल ते अहिल्यावाडी पुलापर्यंत शोधकार्य सुरू ठेवले. मात्र, दीपकचा शोध लागला नाही. त्यात आजही पुन्हा एकदा हा परिसर पिंजून काढण्यात येणार आहे.

जीवन अमूल्य…

नवरा-बायकोमध्ये वाद होतात. कधी-कधी फारकत सुद्धा होते. मात्र, झालेल्या घटनांमुळे खचून जायचे नाही. शेवटी नवरा काय किंवा बायको काय, दोघांचेही आयुष्य अमूल्य आहे. त्यामुळे त्यांनी कोणताही असा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन यानिमित्ताने पोलिसांनी केले आहे.

इतर बातम्याः

विधानसभा अध्यक्षाची निवड आज होणार? अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता, राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक?

कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, उल्हासनगरच्या प्राध्यापिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा