Navi Mumbai Crime : असलं कसलं प्रेम ? एक्स- गर्लफ्रेंडचं मन जिंकून घेण्यासाठी केला पाठलाग, धमकीही दिली; त्या रोमिओला अखेर पोलिसांनी दाखवला इंगा
एक्स- गर्लफ्रेंडचं मन पुन्हा जिंकण्यासाठी तिचा पाठलाग करत त्रास देणाऱ्या तरूणाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. नवी मुंबईत हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले.

मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं ! प्यार मे कुछ सही गलत नही होता… अशी अनेक वाक्य आपण आत्तापर्यंत ऐकली असतील, काही अंशी ती खरी असू शकतात. पण एखाद्याच्या प्रेमामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्रास होत असेल तर असल्या प्रेमाचा काय उपयोग ? अशाच एका घटनेत तरूणाने त्याच्या ‘तथाकथित’ प्रेमासाठी जे पाऊल उचलले त्याने सर्वच हादरले. मूळच्या मध्य प्रदेशच्या असलेल्या या तरूणाने त्याचं जुन प्रेम मिळवण्यासाठी म्हणजेच एक्स- गर्लफ्रेंडचं मन जिंकण्यासाठी तिचाच पाठलाग (stalking) सुरू केला. एवढंच नव्हे तर तिने परत येण्यास नकार दिल्यावर तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (socail media) टाकले. माजी मैत्रिणीचा पाठलाग करणे आणि धमकी देणे याप्रकरणी अखेर त्या मुलावर (वय २५) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या रोमिओला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी (वय २१) हे दोघेही खारघरमधील एका कॉलेजचे विद्यार्थी आहेत. काही काळापूर्वी ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर ते वेगळे झाले. मात्र त्यानंतरही त्या तरूणाचे मुलीवर प्रेम होते आणि ती आयुष्यात परत यावी अशी त्याची इच्छा होती. त्यासाठीच , आपण पुन्हा मित्र बनूया असा आग्रह तो तिला करत होता..
सोशल मीडियावर टाकले आक्षेपार्ह फोटो
मात्र, त्या तरूणीने त्याच्या या प्रस्तावाला थेट नकार दिल्यामुळे , आरोपी तरूणाने तिचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. तो तिला आक्षेपार्ह मेसेजेस पाठवत होता. एवढेच नव्हे तर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केले,असे पोलिसांनी सांगितले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर आरोपीने तरूणीचा विनयभंगही केला. आणि आपली मैत्री स्वीकारली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही दिला. जानेवारी 2022 पासून हा सर्व प्रकार सुरू होता, असेहू पोलिसांनी नमूद केले.
अखेर त्या तरूणाच्या त्रासाला कंटाळून पीडित तरूणीने खारघर पोलिसांत धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली.
