
नवी दिल्लीतील भारतीय नौदलाच्या मुख्यालयात पोस्टिंगवर असलेल्या एका कर्मचाऱ्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. देशाच्या संरक्षणाशी संबंधित गोपनीय माहिती तो पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ला पुरवत होता. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सुद्धा त्याने हेच काम केलं. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव विशाल यादव आहे. तो नौदलाच्या मुख्यालयात क्लार्क म्हणून नोकरी करत होता. तो हरणायाचा राहणारा आहे. अनेक महिने त्याच्यावर पाळत ठेऊन राजस्थान पोलिसांच्या इंटेलिजन्स शाखेने त्याला ताब्यात घेतलं. हिंदुस्थान टाइम्सने एनडीटीव्हीच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
“ISI कडून जी हेरगिरीची काम सुरु होती, त्यावर राजस्थान पोलिसांची CID शाखा लक्ष ठेऊन होती. या दरम्यान त्यांनी विशाल यादवला अटक केली. पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेसाठी काम करणाऱ्या एका महिलेच्या तो संपर्कात होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो संपर्कात होता” वरिष्ठ पोलीस अधिकारी विष्णूकांत गुप्ता यांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने हे म्हटलं आहे.
माहिती देण्याच्या बदल्यात विशाल यादवला काय मिळालं?
नौदल मोहिमांबद्दलची गोपनीय माहिती आणि अन्य संरक्षण संस्थांबद्दल त्याने महिलेला माहिती पुरवली. प्रिया शर्मा या नावाने ती महिला विशाल यादवच्या संपर्कात होती. ती आयएसआय एजंट होती. या संवेदनशील माहितीच्या बदल्यात तिने विशाल यादवला पैसे दिल्याचे पोलिसांनी सांगितलं.
मोबाइलच्या तपासातून काय समजलं?
मोबाइलच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर विशाल यादव अनेक वर्षापासून या महिलेच्या संपर्कात असल्याच समजलं. बराचा डाटा त्याने ट्रान्सफर केला होता. ऑपरेशन सिंदूरबद्दलची माहिती सुद्धा त्याने दिली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं. अजूनही हे ऑपरेशन सुरु आहे.
कशामुळे तो या जाळ्यात फसला?
विशाल यादवला ऑनलाइन गेमिंगची सवय होती. त्यात त्याचं बरच आर्थिक नुकसान झाल्याच प्राथमिक तपासातून समोर आलय. क्रिप्टोकरन्सी आणि थेट त्याच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायचे. आरोपीला जयपूरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिथे भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या विविध विभागांकडून त्याची चौकशी सुरु आहे. त्याने कुठपर्यंत गोपनीय माहिती दिलीय. अजून या हेरगिरीच्या नेटवर्कमध्ये कोण आहेत? ते शोधून काढण्यासाठी विशाल यादवची कसून चौकशी सुरु आहे.