
ग्रेटर नोएडाच्या सूजरपूरमध्ये गुरुवारी रात्री मोठी सनसनाटी घटना घडली आहे. एका तरुणाची डेडबॉडी हायराईज सोसायटीच्या एका इमारतीच्या बाल्कनीत त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनीष असं या 20 वर्षाच्या तरुणाचं नाव आहे. तो सिकंदराबादच्या निजामपूर येथील रहिवासी आहे. काही मित्रांच्या सांगण्यावरून तो नोएडात आला होता. त्याच्या मित्रांनी पॅरामाऊंट सोसायटीच्या ओक टॉवरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. या ठिकाणी त्यांनी जोरदार पार्टी केली, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष आणि त्याचे मित्र पार्टी झाल्यावर रात्री रुममध्ये झोपले होते. सकाळी सोसायटीतील काही लोकांनी एका तरुणाला बाल्कनीत निपचित पडलेलं पाहिलं. आधी लोकांना समजलं नाही. पण जेव्हा जाऊन पाहिलं तेव्हा या तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर लोकांनी 112 क्रमांक फिरवून पोलिसांना सूचना दिली. काही वेळातच सूरजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पंचनामा केला.
हत्या की आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू
याबाबत सूरजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्राथिकदृष्ट्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याचं दिसत आहे. ही आत्महत्या आहे की धक्काबुक्कीत पडला की एखादी गुन्हेगारी घटना आहे, याचा आम्ही शोध घेत आहोत. पण त्यावर आतच काही सांगणं कठिण आहे. आम्ही याबाबतची चौकशी करत आहोत. पार्टीवेळी दारू व्यतिरिक्त अन्य काही नशा केला होता का? तसेच हा तरुण मानसिक तणावात होता का? याचाही आम्ही तपास करत आहोत, असं विनोद कुमार यांनी सांगितलं.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाल्कनी, फ्लॅट आणि आजूबाजूच्या परिसराची कसून पाहणी केली. मनीषजवळ सुसाईड नोटही सापडलेली नाहीये. पोलिसांनी या फ्लॅटमध्ये थांबलेल्या त्याच्या मित्रांचीही कसून चौकशी केली. त्यांनी कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा झगडा कानावर आला नसल्याचं सांगितलं. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून फ्लॅट सील केला आहे. तसेच पोलिसांनी तपास हाती घेतला असून महत्त्वाचे धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पोस्टमार्टमनंतर खुलासा
पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात मनीषचा मृतदेह पाठवला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस सध्यातरी आत्महत्या आणि दुर्घटना या दोन्ही अँगलने तपास करत आहेत. मात्र, कोणत्याही प्रकारची शक्यता नाकारली जात नाहीये. मनीषच्या कुटुंबीयांनीही पोलिसांनी माहिती दिली आहे.