समृद्धी महामार्गावर झायलो कारचे टायर फुटले, अपघातात कारमधील एकाचा करुण अंत

मुळेकर कुटुंबीय काही निमित्ताने नागपूरहून अकोल्याकडे चालले होते. यावेळी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अमरावतीच्या हिंगनगाव परिसरात समृद्धी महामार्गावर त्यांच्या झायलो गाडीचा टायर फुटला.

समृद्धी महामार्गावर झायलो कारचे टायर फुटले, अपघातात कारमधील एकाचा करुण अंत
अमरावतीत समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Image Credit source: TV9
| Updated on: Feb 27, 2023 | 7:34 PM

अमरावती / सुरेंद्रकुमार आकोडे : कारचा टायर फुटल्याने समृद्धी महामार्गावर झायलो कारचा भीषण अपघात झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य सात जण जखमी झाले आहेत. पहाटे 4 वाजता अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. अमरावतीच्या हिंगनगाव नाजिक ही घटना घडली. गाडीतील सर्व प्रवासी एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. सर्व जण नागपूरहून अकोल्याकडे जात असताना हा अपघात घडला. अपघातात गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

हरिभाऊ मुळेकर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर राजेंद्र मुळेकर, रुद्र मुळेकर, आस्था मुळेकर, दक्ष मुळेकर, लीलाबाई मुळेकर, दीपाली मुळेकर, सोनी मुळेकर आणि गजानन मुळेकर अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. सर्व जखमींवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काही कामानिमित्त नागपूरहून अकोल्याकडे चालले होते कुटुंबीय

मुळेकर कुटुंबीय काही निमित्ताने नागपूरहून अकोल्याकडे चालले होते. यावेळी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अमरावतीच्या हिंगनगाव परिसरात समृद्धी महामार्गावर त्यांच्या झायलो गाडीचा टायर फुटला. या अपघातात कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ मुळेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर कुटुंबातील अन्य सात सदस्य जखमी झाले.

नागपूरमध्ये ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक

नागपूर-मुंबई महामार्गावर कोंढाळीजवळ ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जखमी झाले. नागपूर-मुंबई महामार्गावर कोंढाळीपासून 7 किमी अंतरावर खुर्सापार पोलीस चौकी जवळ ही घटना घडली. दोन जखमींना महामार्ग पोलिसांनी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे.