Mumbai Crime : वेब सीरिजमध्ये काम देण्याचं आश्वासन देऊन मॉडेलचं लैंगिक शोषण, फोटोग्राफरला अखेर अटक !

पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Mumbai Crime : वेब सीरिजमध्ये काम देण्याचं आश्वासन देऊन मॉडेलचं लैंगिक शोषण, फोटोग्राफरला अखेर अटक !
| Updated on: Sep 07, 2023 | 11:55 AM

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : काम मिळवून देण्याचे आश्वासन देत गोड बोलून मॉडेलचा विश्वास संपादन केला. मात्र नंतर तिला लॉजवर नेऊन तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका फोटोग्राफरला पोलिसांनी अटक (photographor arrested) केली आहे. पीडित मॉडेलच्या तक्रारीवरून डी.एन. नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हिमल मेहता असे त्या फोटोग्राफरचे नाव आहे. वेब सीरिजमध्ये काम मिळवून देतो असे सांगत त्याने पीडितेला लॉजवर नेले आणि तेथे तिच्या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन तिचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे.

पीडित तरूणी 30 वर्षांची असून हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळवण्यापूर्वी ती मॉडेलिंग करत होती. त्यावेळी तिची फोटोग्राफर मेहता याच्याशी ओळख झाली आणि ते हळूहळू मित्र बनले. आरोपीने त्याच्या कामाबद्दल आणि त्याच्या शिफारशीमुळे अनेक तरूणांना वेब सीरिजमध्ये काम करण्याची कशी संधी मिळाली याबद्दल पीडित तरूणीसमोर अनेक वेळा बढाई मारली होती.

त्याने गोड-गोड बोलून पीडितेचा विश्वास संपादन केला आणि यावर्षी जानेवारी महिन्यात तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. पीडितेने तक्रारीत नमूद केल्यानुसार, तिच्या पेयामध्ये गुंगीचं औषध टाकून तिचं लैंगिक शोषण करण्यापूर्वी त्याने पीडितेचे काही फोटो काढले होते. त्यानंतर आरोपीने तिला फोटो प्रूफ दाखवत ते व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. यामुळे घाबरलेल्या मॉडेलने तिचं तोंड बंद ठेवलं होतं. मात्र ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तिने पोलिसांत धाव घेत आपबीती सांगितली.

पोलिसांनी मेहता याच्याविरुद्ध बलात्कार आणि शोषण केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला अंधेरी कोर्टात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.