
दिल्लीत काल झालेल्या स्फोटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे. दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी 6:52 च्या सुमारास शक्तीशाली कार स्फोट झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात आहे. ते भूतान दौऱ्यावर आहेत. तिथे एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली स्फोटावर आपली भूमिका मांडली. आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच मोदी म्हणाले की, “आज मी इथे जड अंतकरणाने आलोय. काल संध्याकाळी दिल्लीत झालेल्या भयावह घटनेने सर्वांच मन व्यथित झालय. या स्फोटामागे जे आहेत, ज्यांनी हे षडयंत्र रचलं त्यांना सोडणार नाही” असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. “तपास सुरु आहे. आम्ही तपासाच्या शेवटापर्यंत जाणार. जे जबाबदार आहेत, त्यांना सोडणार नाही. सरकार प्रत्येक एका गोष्टीचा तपास करत आहे. रिपोर्ट आल्यानंतर कारवाई होईल” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“आजचा दिवस भूतानसाठी, भूतानच्या राज परिवारासाठी आणि जागतिक शांततेवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी महत्वाचा आहे. अनेक शतकांपासून भारत आणि भूतानमध्ये आत्मीय आणि सांस्कृतीक नातं आहे. म्हणून या महत्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणं ही भारताची आणि माझी कमिटमेंट होती” असं पीएम मोदी म्हणाले. “आज मी इथे जड अंतकरणाने आलोय. काल संध्याकाळी दिल्लीत झालेल्या भयावह घटनेने मन व्यथित झालय. मी पीडित कुटुंबांच दु:ख समजतो. आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. मी काल रात्रभर या घटनेचा तपास करणाऱ्या एजन्सींजच्या संपर्कात होतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
राजनाथ सिंह काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्टेटमेंट येण्याआधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची दिल्लीत प्रेस कॉन्फ्रेंस झाली. राजनाथ यांनी सांगितलं की, “तपासानंतर रिपोर्ट सार्वजनिक केला जाईल. आता आम्ही कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही. तपास यंत्रणा सर्व अंगांनी तपास करतायत. वेळ आल्यावर सर्व तपास सार्वजनिक केला जाईल. पण एक गोष्ट नक्की आहे, कुठल्याही दोषीला सोडणार नाही”