अनोळखी मुलीसोबत फेसबुकवर मैत्री करणं महागात, व्हिडीओ कॉल करत अश्लील चाळे, नंतर धमकी देत साडेपाच लाख लुबाडले

| Updated on: Sep 16, 2021 | 8:01 PM

फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया साईट्सवर कुणासोबतही दोस्ती करताना काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. कारण आपण भोळेपणात कुणावरही विश्वास ठेवतो. पण काही लोक आपल्या साधेपणाचा फायदा घेऊन नंतर आपल्यालाच त्रास देतात.

अनोळखी मुलीसोबत फेसबुकवर मैत्री करणं महागात, व्हिडीओ कॉल करत अश्लील चाळे, नंतर धमकी देत साडेपाच लाख लुबाडले
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे : फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया साईट्सवर कुणासोबतही दोस्ती करताना काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. कारण आपण भोळेपणात कुणावरही विश्वास ठेवतो. पण काही लोक आपल्या साधेपणाचा फायदा घेऊन नंतर आपल्यालाच त्रास देतात. असाच काहिसा प्रकार पुण्यात समोर आला आहे. एका 35 वर्षीय व्यक्तीला फेसबुकरच्या एका मैत्रिणीने अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांचा गंडा घातला. पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला. पुण्याचे विश्रांतवाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पीडित तरुण हा पुण्याच्या धनोरी येथे वास्तव्यास आहे. त्याची काही दिवसांपूर्वी फेसबुकवर झिनत शर्मा नावाच्या एका तरुणीसोबत मैत्री झाली होती. फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केल्यानंतर दोघांची एकमेकांशी चॅटद्वारे बातचित सुरु झाली. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांची बातचित सुरु होती. अखेर एकेदिवशी झिनतने पीडित तरुणाला व्हिडीओ कॉल केला.

मुलीचे अश्लील चाळे

व्हिडीओ कॉल उचलल्यानंतर पीडित तरुण चक्रावला. कारण संबंधित तरुणी ही नग्नावस्थेत होती. तिने नग्नावस्थेत अश्लील चाळे करत पीडित व्यक्तीला देखील कपडे काढण्यास भाग पाडले. संबंधित व्यक्तीही तिच्यासारखे चाळे करु लागला. आरोपी मुलीने हा सगळाप्रकार मोबाईलमध्ये स्क्रिन रेकॉर्डद्वारे कैद केला. त्यानंतर तिने पीडित व्यक्तीला त्याचा अश्लील व्हिडीओ पाठवला.

पीडित व्यक्तीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

आरोपी मुलीने पीडित व्यक्तीकडून पैशांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाही तर व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी तिने दिली. त्यामुळे पीडित व्यक्तीने घाबरुन आरोपी तरुणीने सांगितलेल्या दोन बँक खात्यात एकूण 5 लाख 54 हजार 100 रुपये पाठवले. मात्र, तरीदेखील आरोपी तरुणीच्या अपेक्षा कमी होत नव्हत्या. ती वारंवार पैशांची मागणी करत होती. अखेर तिच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यक्तीने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. पीडित व्यक्तीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात जावून सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सायबर गुन्हेगारांकडून वृद्धांना टार्गेट

काही दिवसांपूर्वी सायबर पोलिसांनी महत्त्वपूर्ण माहिती जारी केली होती. सायबर गुन्हेगार सध्या वयोवृद्ध पुरुषांना टार्गेट करत असल्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. तसेच सर्वच वयोगटातील नागरिकांनी सायबर गुन्हेगारांच्या भूलथापानां बळी पडू नये, असं आवाहन केलं होतं. विदेशी किंवा अनोळखी फोन नंबरवरुन पैशांचे आमिष दाखवणारे फोन आले तर त्यांना फारसा प्रतिसाद न देण्याचं आवाहन याआधीच करण्यात आलं आहे. तसेच आपली वैयक्तिक कोणतीही माहिती पोलिसांना न देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप सारख्या प्रकरणातही अडवलं जात असल्याचं याआधी देखील उघड झालं आहे. त्यामुळे सायबर पोलिसांकडून अनेकदा सतर्कतेचं आवाहन करण्यात येत असतं. पण तरीही अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत.

हेही वाचा :

‘राज काय करायचा हे मी विचारलेच नाही…’, अश्लील चित्रपट प्रकरणात शिल्पा शेट्टीने नोंदवला जबाब!

काळी जादू शिकण्याचा नादात पोटच्या मुलीला संपवलं, पोलिसांनी दरवाजा उघडताच तिचाही नग्नावस्थेत मृतदेह