पुरंदरमध्ये मुळशी पॅटर्न, कुख्यात गुंड गणेश रासकरची हत्या

| Updated on: Jul 16, 2021 | 11:14 PM

नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.

पुरंदरमध्ये मुळशी पॅटर्न, कुख्यात गुंड गणेश रासकरची हत्या
कुख्यात गुंडावर अज्ञातांकडून गोळीबार
Follow us on

पुणे : पुण्याचा पुरंदर तालुका आज (16 जुलै) संध्याकाळी हत्येच्या घटनेने हादरला आहे. नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर (वय 41) याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित गोळीबाराची घटना ही संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेला. त्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटनेची माहिती मिळताच नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गुंड गणेश विठ्ठल रासकर हा सायंकाळी सात वाजता नीरा येथील पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील एस्टी स्टँडनजीक पल्सर गाडीवर आला होता. यावेळी त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी फरार झाले.

रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित

गणेश रासकर याच्या डोक्याच्या मागच्या भागात खोलवर जखम झाली. त्याला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं. त्यानंतर पुढील सोपस्करासाठी जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात म्रुतदेह पाठवण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास करीत आहेत.

मुंबईला निघालेल्या प्रवाशाची पुण्यात हत्या

संबंधित घटनेआधी पुण्यात आणखी एक हत्येची घटना नुकतीच समोर आली आहे. पुणे स्टेशनजवळ बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईला जाण्यासाठी रात्रीच्या वेळेस प्रवासाची सोय न झाल्यामुळे प्रवासी स्टेशनजवळ असलेल्या एका बस थांब्यावर झोपला होता. यावेळी तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याची हत्या करण्यात आली. संजय बाबू कदम असे हत्या झालेल्या 35 वर्षीय प्रवाशाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील एका हॉटेलात संजय काम करत होता. संजय पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. मात्र रात्री प्रवासाची सोय होऊ न शकल्यामुळे तो बस स्टॉपवरच झोपला. त्यावेळी त्याची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा : दुहेरी हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरला; भांडणातून सुनेची केली हत्या, मग पत्नीला संपवले!