Pune Crime : दु:खात आहोत, डीजे लावू नका म्हणताच टोळक्याचा हल्ला; काय घडलं पुढे ?

घरातील दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबिय दु:खात होते. घरासमोरून गणपती विसर्जनाची मिरवणूक जात असताना डीजे लावला होता. कुटुंबातील सदस्यांनी डीजे न लावण्याची विनंती केली. मात्र याचा राग मनात धरून ठेवून टोळक्यातील काही जणांनी कुटुंबियांना बेदम मारहाण केली.

Pune Crime : दु:खात आहोत, डीजे लावू नका म्हणताच टोळक्याचा हल्ला; काय घडलं पुढे ?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 29, 2023 | 10:18 AM

रणजित जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 29 सप्टेंबर 2023 :  राज्यभरात काल गणरायाचे विसर्जन उत्साहात पार पडले. ‘ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ‘ असा जयघोष करत भाविकांनी लाडक्या गणाधीशाला साश्रू नयनांनी निरोप दिला. अनेक ठिकाणी विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, लेझीम खेळत, गुलाल उधळत तर कुठे डीजेच्या तालावर भाविक थिरकत होते. अनेक तास मिरवणूक सुरू होती. विसर्जनानंतर भाविक जड पावलांनी घरी आले.

पण याचा सणाला गालबोट लावणारी एक दुर्दैवी घटना पुण्यात घडली. गणपती विसर्जन करून आलेल्या काही व्यक्तींनी मनात राग धरून ठेवत एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे. पुण्यातील मावळ परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर तळेगाव पोलिसांनी 21 जणांना अटक केली.

डीजे लावू न दिल्याचा राग मनात धरला

पुण्यात गणेशोत्सव मोठ्या थाटात पार पडला. काही ठिकाणी संपूर्ण दहा दिवस गणपती बसवण्यात आले, त्यांचे काल अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यात आले. तर ज्यांच्या घरी किंवा मंडळात ७ दिवस गणेशोत्सव होता, त्या बाप्पाचे विसर्ज सोमवारी, 25 सप्टेंबर पार पडले. त्याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

25 तारखेला सोमाटणे फाटा या ठिकाणी सुनील प्रभाकर शिंदे यांच्या घरासमोरून गणपती विसर्जनाची मिरवणूक जात होती. डीजे लावून, मोठमोठ्याने गाणी वाजवत, नाचत भाविक गणरायाला निरोप देण्यासाठी जात होते. सर्वजण आनंदात होते. मात्र शिंदे यांच्या घरी दु:खाचे वातावरण होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी एक दु:खद घटना घडली. शिंदे यांच्या मुलाचे अवघ्या काही दिवसांपूर्वीच निधन झाले, त्यामुळे सर्वच कुटुंबीय शोकाकुल अवस्थेत होते.

त्यांच्या घरासमोरून गणपती मिरवणूक जात होती. तेव्हा शिंदे यांनी त्या लोकांसमोर जावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वजण दु:खात आहोत. कृपया इथे डीजे लावू नका अशी विनंती त्यांनी केली. ते ऐकून आरोपींना राग आला पण तेव्हा डीजे न वाजवता न ते पुढे निघून गेले. मात्र हाच राग मनात धरून ठेवला आणि विसर्जनावरून परत येताना त्यांनी शिंदे कुटुबियांना बेदम मारहाण केली. यानंतर पीडित कुटुंबाने तळेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली असता आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी 21 जणांना अटक केली आहे.