Raja Raghuvanshi Murder: राजा टॉयलेटला गेला अन् मागून सोनमने… हत्येच्या क्षणी नेमकं काय घडलं? ‘ऑपरेशन हनीमून’मध्ये अखेर रहस्य उलघडलं

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे राजा रघुवंशी प्रकरणात अखेर रहस्य उलघडलं आहे. राजाची हत्या कशी झाली हे समोर आले आहे.

Raja Raghuvanshi Murder: राजा टॉयलेटला गेला अन् मागून सोनमने... हत्येच्या क्षणी नेमकं काय घडलं? ऑपरेशन हनीमूनमध्ये अखेर रहस्य उलघडलं
Raja Raghuvanshi
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 18, 2025 | 12:31 PM

मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशीत राजाची आरोपी पत्नी सोनम आणि तिचे मित्र नवीन माहिती सांगत आहेत. त्यांनी शिलाँगमधील घटनास्थळी नेमकं काय घडलं हे सांगितले. ते म्हणाले, की सर्व काही सोनमच्या एका इशाऱ्यावर घडले. खरेतर, शिलाँग पोलिसांनी मंगळवारी क्राइम सीन पुन्हा रंगवला होता. पोलिसांनी सांगितले की, सर्व आरोपींची गेल्या काही दिवसांत चौकशी करण्यात आली होती. याच आधारावर क्राइम सीन रंगवला गेला. यावेळी पोलिसांना नवी माहिती मिळाली.

शिलाँगचे एसपी विवेक सिम यांनी सांगितले की, हत्येच्या वेळी सोनम तिथे उपस्थित होती. पोस्टमॉर्टममधून कळले आहे की, राजाची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली. त्यांनी सांगितले की, पार्किंगच्या जागेवर पोहोचण्यापूर्वी सोनमने हत्येच्या कटात सहभागी असलेल्या साथीदारांना इशारा केला होता. तेव्हा राजा टॉयलेटला गेला होता.

वाचा: काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! विमान अपघातानंतर विद्यार्थांनी मारल्या बाल्कनीमधून उड्या

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनमचा इशारा मिळताच विशाल उर्फ विक्कीने प्रथम राजाच्या डोक्यावर वार केला. त्याच्या डोक्यातून रक्ताची धार निघू लागली. त्यानंतर आनंदने आणि शेवटी आकाशनेही राजावर जीवघेणा हल्ला केला. हल्ला इतका भयंकर होता की राजा अर्धमेला झाला आणि त्याच्या संपूर्ण शरीरातून रक्त निघू लागले. रक्त पाहून सोनमची किंचाळी निघाली आणि ती तिथून निघून गेली. मात्र, तिच्या साथीदारांना अजून काम पूर्ण करायचे होते. त्यांनी राजाचा मृतदेह खाडीत फेकला. त्यानंतर ते तिथून पळून गेले.

कहाणी कुठून सुरू झाली?

मध्य प्रदेशातील इंदौरचा रहिवासी राजा रघुवंशी आपल्या पत्नीसोबत मेघालयच्या सोहरा येथे हनीमूनसाठी गेला होता. याच ट्रिपवर त्याची हत्या करण्यात आली. हत्येचा गुंता अनेक दिवस अनुत्तरित राहिला. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन द्यावे लागले. त्यानंतर मेघालय पोलिसांनी प्रकरण सोडवण्यासाठी जीव तोड मेहनत घेतली. हत्येनंतर १७ दिवसांनी पोलिसांना हत्याऱ्यांचा शोध लागला.

धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येचा कट कोणी दुसऱ्याने नव्हे तर राजाची पत्नी सोनमने रचला होता. या कटात चार जणांनी तिची साथ दिली होती. पोलिसांनी सर्व ५ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींची चौकशी केली. या हत्याकांडात राजाची पत्नी सोनम, तिचा कथित प्रियकर राज सिंह कुशवाह आणि त्याचे मित्र आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी यांचा समावेश होता.

पोलिस सर्व आरोपींना त्या ठिकाणी घेऊन गेले जिथे राजाची हत्या झाली होती. पूर्व खासी हिल्सचे पोलिस अधीक्षक विवेक सिम यांनी सांगितले की, आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.

लव्ह ट्रँगल ठरले कारण!

एसपींनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात लव्ह ट्रँगल हे कारण समोर आले आहे. मात्र, तपास अधिकारी केवळ लव्ह ट्रँगललाच एकमेव कारण मानत नाहीत. ते इतर पैलूंनाही लक्षात घेऊन तपास करत आहेत. पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्रही झऱ्याजवळून जप्त केले आहे. जिथे राजाचा मृतदेह सापडला होता, तिथूनच शस्त्र जप्त करण्यात आले. सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून तपास सुरू आहे.