RFO दीपाली चव्हाण आत्महत्या : DFO विनोद शिवकुमार निलंबित, APCCF श्रीनिवास रेड्डींची उचलबांगडी

| Updated on: Mar 26, 2021 | 9:58 PM

दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेल्या DFO विनोद शिवकुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची फिल्ड डायरेक्टर पदावरुन उलबांगडी करण्यात आली आहे.

RFO दीपाली चव्हाण आत्महत्या : DFO विनोद शिवकुमार निलंबित, APCCF श्रीनिवास रेड्डींची उचलबांगडी
RFO दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
Follow us on

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसलच्या RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेल्या DFO विनोद शिवकुमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची फिल्ड डायरेक्टर पदावरुन उलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना वन बल कार्यालयात तात्पुरती हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. RFO दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं दीपाली यांनी लिहिलं आहे. (RFO Deepali Chavan suicide case: DFO Vinod Shivkumar suspended and APCCF Srinivasa Reddy transferred)

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचा पदभार CCF प्रवीण चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. तर DFO विनोद शिवकुमार यांच्या जागी अविनाश कुमार यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. वनविभागाचे वन बल प्रमुख व्ही. साईप्रकाश आणि वाईल्ड लाईफ प्रमुख नितीन काकोडकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

DFO विनोद शिवकुमार यांना अटक

RFO दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपाखाली DFO विनोद शिवकुमार यांच्यावर धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याता आला. त्यानंतर शिवकुमार यांच्या अटकेसाठी पोलिसांनी नाकाबंदी केली. अखेर नागपूर रेल्वे स्टेशनवरुन शिवकुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर वनविभागाचे प्रधान सचिव दर्जाचे दोन अधिकारी व्ही. साईप्रकाश आणि नितीन काकोडकर हे अमरावतीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर फॉरेस्ट रेंजर असोसिएशनचे पदाधिकारीही मोठ्या संख्येनं अमरावतीत दाखल झाले आहेत. यावेळी APCCF श्रीनिवास रेड्डी यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दीपाली चव्हाण यांच्या पत्रात गंभीर आरोप

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपाली चव्हाण यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्यात खालील आरोपांचा समावेश आहे.

>> ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही.

>> रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होती. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शक नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे.

>> माझ्या रेंजमधील सर्व काम करुनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरुन कामावर रुजू होत नव्हते पण तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला असल्याचे दीपाली चव्हाण यांनी पत्रात म्हटले होते.

संबंधित बातम्या :

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

‘त्या’ अधिकाऱ्याकडून दीपालीच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न; ही आत्महत्या नवे तर हत्या: चित्रा वाघ

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

RFO Deepali Chavan suicide case: DFO Vinod Shivkumar suspended and APCCF Srinivasa Reddy transferred