
कल्पना करा, एखादी स्त्री आपल्या मुलांसह शहर सोडून गुहेत राहायला लागली… ना वीज, ना इंटरनेट, ना पक्के छत, फक्त निसर्गाच्या सान्निध्यात. मोकळे आकाश, गवत, धबधब्याचा आवाज आणि जंगलातील शांती. असेच काहीसे रशियाची नीना कुटीना आणि तिच्या दोन मुली करत होत्या. त्या भारतातील कर्नाटक राज्यातील गोकर्णजवळील एका गुहेत अनेक वर्षांपासून राहत होत्या. तिथे त्यांना शांती मिळत होती. त्यांना पावसाचा आनंद वाटायचा, त्या सापांना घाबरत नव्हत्या आणि त्या म्हणाल्या की जंगलात शहरांपेक्षा जास्त सुरक्षित वाटले.
पोलिसही चकित झाले!
पण अचानक पोलिस तिथे पोहोचले. त्यांनी नीना आणि तिच्या मुलांना त्या गुहेतून बाहेर काढले. सुरुवातीला त्यांना जवळच्या कुमटा परिसरातील एका आश्रमात ठेवण्यात आले. काही दिवसांनंतर सरकारी आदेशानुसार त्यांना तुमकुरू जिल्ह्यातील डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. आता त्या म्हणतात की त्या जणू तुरुंगासारख्या वातावरणात अडकल्या आहेत. ना आकाश दिसते, ना हिरवळ, ना ताजी हवा. त्यांना थंड आणि कठीण जमिनीवर झोपावे लागत आहे.
सोशल मीडियावर शेअर केली कहाणी
नीनाने आपली गोष्ट सोशल मीडियावर लोकांसह शेअर केली. तिने लिहिले की, यापूर्वी त्यांचे ‘घर’ एक सुंदर गुहा होती. तिथे धबधब्याचा आवाज यायचा, मुलांना खेळण्यासाठी गवत होते आणि आयुष्यात शांती होती. पण आता त्या अशा ठिकाणी आहेत ज्याला त्या ‘कैद’ म्हणतात. त्या लिहितात, “आमचे गुहेतील आयुष्य संपले. आता आम्ही अशा ठिकाणी आहोत जिथे काहीच नाही. ना आकाश, ना धबधबा, फक्त एक थंड जमीन आहे.”
नीनाला अटक का झाली?
आता प्रश्न पडतो की, नीना आणि तिच्या मुलींना पोलिसांनी का हटवले? खरेतर, नीना 2016 मध्ये रशियातून बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. तिने गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये काही काळ कामही केले. पण जेव्हा तिचा व्हिसा संपला, तेव्हाही ती भारतात राहिली. 2018 मध्ये तिला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. पण ती नेपाळला गेली आणि पुन्हा गोकर्णला परतली. तिचा पासपोर्टही 2019 मध्ये कालबाह्य झाला होता. त्यामुळे आता सरकार तिला रशियाला परत पाठवण्याची तयारी करत आहे.
नीनाचा प्रश्न “माणूसच सर्वात धोकादायक आहे का?”
नीनाचा म्हणणे आहे की, जंगलात तिला कधीही कोणत्याही प्राण्यापासून धोका जाणवला नाही. ना सापाने चावले, ना कोणत्याही प्राण्याने हल्ला केला. पण माणसांपासून तिला नेहमीच भीती वाटली. ती म्हणते की, माणूस हाच एकमेव असा प्राणी आहे जो दुसऱ्यांना त्रास देतो. मग ते प्राणी असोत वा स्वतःसारखी माणसे. तिच्या मते, “निसर्गाने आम्हाला कधीही त्रास दिला नाही. माणसांनी नेहमीच छळले.”
आता पुढे काय होईल?
सरकारने स्पष्ट केले आहे की, नीना यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल. पण जोपर्यंत त्या तिकीट खरेदी करत नाहीत, तोपर्यंत त्यांना तुमकुरूच्या डिटेंशन सेंटरमध्येच राहावे लागेल. त्या अजूनही आशा बाळगत आहेत की, कदाचित काही मार्ग निघेल आणि त्या पुन्हा त्यांच्या जुन्या आयुष्याकडे, निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या हवेत परत जाऊ शकतील.