
सांगली जिल्ह्यातील आरग येथे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. समलैंगिक संबंधाला विरोध केल्याने दोन अल्पवयीन मित्रांनीच त्यांच्या २१ वर्षीय मित्राची निर्घृण हत्या केली. सुजल बाजीराव पाटील (वय २१, रा. आरग) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सुजल पाटील यांचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आरग येथील एका तलावात आढळून आला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात आणि मिळालेल्या माहितीनुसार, सुजल आणि त्याचे दोन अल्पवयीन मित्र बेळंकी येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर तिघेही दुचाकीवरून घरी परतत होते.
रात्रीच्या वेळी, आरग येथील बेळंकी रोडवरील तलावाजवळ तिघे थांबले. यावेळी सुजलचे दोन्ही मित्र दारूच्या नशेत होते. याच अवस्थेत त्यांनी सुजलसोबत समलैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुजलने याला तीव्र विरोध केला. त्यांना ढकलून दिले. सुजलने विरोध करताच, संतप्त झालेल्या दोन्ही अल्पवयीन मित्रांना राग अनावर झाला. त्यांनी सुजलला बेदम मारहाण केली. त्याचे कपडे फाडून त्याला अर्धनग्न केले. यानंतर त्याला तलावातील पाण्यात बुडवून ठार मारले. सुजलची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह तलावात फेकत पळ काढला.
सकाळी ग्रामस्थांनी तलावात मृतदेह तरंगत असल्याचे पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिली. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी वेगाने तपास करत, या प्रकरणात सहभागी असलेल्या सुजलच्या दोन्ही अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. समलैंगिक संबंधातून अल्पवयीन मित्रांकडूनच मित्राचा खून झाल्याच्या या घटनेने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.