संजय राठोड नॉट रिचेबलच, चर्चगेटच्या घरातील नोकर म्हणतात…

| Updated on: Feb 14, 2021 | 11:15 AM

मंत्रालयासमोर असलेला संजय राठोड यांचा शासकीय बंगला गेले दोन महिने दुरुस्तीमुळे बंद आहे (Sanjay Rathod not reachable Pooja Chavan case)

संजय राठोड नॉट रिचेबलच, चर्चगेटच्या घरातील नोकर म्हणतात...
पूजा चव्हाण, संजय राठोड आणि राठोड यांचे निवासस्थान (मध्यभागी)
Follow us on

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) तीन दिवसांपेक्षा अधिक काळ नॉट रिचेबल आहेत. संजय राठोड यांच्याशी ना फोनवर संपर्क होऊ शकत आहे, ना ते निवासस्थानी आहेत. त्यामुळे संजय राठोड या प्रकरणात आपले मौन नक्की कधी सोडणार, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. (Shivsena Minister Sanjay Rathod not reachable after Pooja Chavan Suicide Case)

संजय राठोड यांचा फोन गेल्या तीन दिवसांपासून नॉट रिचेबल येत आहे. त्यांचा मंत्रालयासमोर शासकीय बंगला गेले दोन महिने दुरुस्तीमुळे बंद आहे. सध्या ते तात्पुरते चर्चगेट भागातील छेडा सदनमध्ये वास्तव्यास होते. परंतु छेडा सदनमधील घरी टीव्ही 9 मराठीच्या टीमने जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राठोड घरी नसल्याचं त्यांच्या घरातील नोकरांनी सांगितलं. संजय राठोड साहेब कुठे आहेत, आम्हाला माहिती नाही, असं नोकरांनी सांगितलं.

 

संजय राठोड यांची विकेट पडणार?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड हेच पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. मात्र संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मूळ बीड जिल्ह्यातील परळीच्या पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात राहत होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने विरोधक आक्रमक झाले. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.

भाजपकडून संजय राठोड यांचे नाव

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली. त्यानंतर भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत राजीनाम्याची मागणी केली. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून कारवाई करण्याची मागणी केली. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.

पोस्टमार्टम अहवालात काय?

पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी शवविच्छेदन अहवालातील मोजकीच माहिती मीडियाला दिली आहे.

त्या दोन व्यक्तींबाबत मौन

पूजाने आत्महत्या केली. तेव्हा तिच्या सोबत घरात दोन व्यक्ती होते. पोलिसांनी त्या दोन व्यक्तिंबाबत मौन पाळलं आहे. त्यांच्याविषयी काहीही माहिती दिली नाही. या दोन व्यक्तींची चौकशी केल्यानंतर त्यातून काय माहिती समोर आली हे पोलिसांनी स्पष्ट केलं नाही. (Shivsena Minister Sanjay Rathod not reachable after Pooja Chavan Suicide Case)

लॅपटॉप, मोबाईलबाबत भाष्य नाही

पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल बाबतही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल जमा केला का? त्याची तपासणी केली का? त्यातून काही माहिती आली का? ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख होत असलेला मोबाईल आणि लॅपटॉप कुठे आहे? याबाबतही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. शिवाय ऑडिओ क्लिपमधील संभाषणाबाबत आणि त्यानुषंगाने करण्यात आलेल्या तपासाबाबतही पोलिसांनी मौन पाळलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच संशय निर्माण होत आहे.

संबंधित बातम्या : 

भाऊ, पूजा ताई र आत्महत्या छ कि घात पात हाई?; फेसबुकवर राठोडांना नेटकऱ्यांचा सवाल

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

(Shivsena Minister Sanjay Rathod not reachable after Pooja Chavan Suicide Case)