Jalgaon Crime : भरधाव कारची तिघांना धडक, महिला फूटबॉलसारखी उंच उडून धाडकन आपटली.. थरारक अपघात CCTVत कैद

जळगावमध्ये मद्यधुंद कारचालकाने केलेल्या भीषण अपघातात तीन जण जखमी झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेल्या धक्कादायक दृश्यानुसार, चालकाने दीड किलोमीटरवर तीन जणांना उडवले. आरोपी कारचालकाला अटक करण्यात आली आहे. जखमी महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Jalgaon Crime : भरधाव कारची तिघांना धडक, महिला फूटबॉलसारखी उंच उडून धाडकन आपटली.. थरारक अपघात CCTVत कैद
जळगावात भीषण अपघात
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 20, 2025 | 8:54 AM

जळगावमध्ये एका भीषण अपघातामुळे अख्खं शहर हादरलं आहे. भरधाव वेगाने आलेल्या कारने एका महिलेसह तिघांना जोरदार धडक देऊन उडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारचालक दारूच्या नशेतच गाडी चालवत होता. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने दीड किलोमीटरच्या अंतरात महिलेसह तीन जणांना उडवले. ही थरारक घटना शहरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपी कारचालकास ताब्यात घेण्यात आलं आहे. या दुर्दैवी घटनेत जबर जखमी झालेल्या महिलेची प्रकृती अतिशय चिंताजनक असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील महाबळ परिसरात एक भरधाव कारने महिलेला उडवले. त्यामुळे ती महिला एखाद्या फूटबॉलसारखी हवेत 15 ते 20 फूट उंच उडून धाडकन खाली आपटली. त्यात ती जबर जखमी झाली. मात्र त्यानंतरही कारचालक थांबला नाही, खाली पडल्यावर त्याच वाहनाने महिलेला 100 ते 200 मीटरपर्यंत फरफटत नेलं. हा सगळा धक्कादायक प्रकार त्या रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

आपण नक्की काय करतोय हे सुद्धा त्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालकाला समजत नव्हतं, त्याने कार तशीच पुढे रेमटवली आणि एका घराच्या बाहेर ओट्या तसेच बाकड्यांना सुद्धा जोरदार धडक दिल्याने नुकसान झाले. त्याने अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरामध्ये त्या महिलेसह एकूण तिघांना उडवलं. हा सगळा भयाक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे धक्कादायक फुटेज समोर आलं आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आरोपी मद्यधुंद चालक आणि त्याची कार, हे दोन्ही ताब्यात घेतलं असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या घटनेत जबर जखमी झालेल्या महिलेची प्रकृती अतिशय चिंताजनक असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जळगावमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.