
सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथे एका हिंदी चित्रपटालाही लाजवेल असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमासाठी एका विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने एका वेडसर महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचा प्रकरण पोलिसांनी उघड केले आहे. या प्रकरणी विवाहिता आणि तिच्या प्रियकराला मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे.
सोमवारी १४ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पाटकळ येथील नागेश सावंत यांच्या पत्नी किरण यांनी शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली गेती. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. यानंतर नागेश सावंत पत्नीच्या विरहामुळे रडत होते. किरणचे वडीलही तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने किरणच्या वडिलांनाही तो ओळखता आला नाही. मात्र, त्यांना आपली मुलगी आत्महत्या करेल यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी तात्काळ पोलिसांना या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची विनंती केली. यानंतर किरणची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
किरणच्या माहेरच्यांच्या संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे वाटत असले तरी, पोलिसांना हा खून असल्याचा संशय येऊ लागला. जळालेल्या मृतदेहाजवळ किरणचा जळालेल्या अवस्थेतील फोन सापडला. पोलिसांनी या फोनच्या सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) ची तपासणी केली असता, त्यांना एका तरुणावर संशय आला. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने आपणच या विवाहितेची हत्या केल्याचे कबूल केले.
मात्र, पोलिसांनी त्याला घटनास्थळी घेऊन जाण्यास सुरुवात करताच त्याने धक्कादायक सत्य उघड केले. त्याने सांगितले की, ज्या विवाहितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे, ती मेलेली नसून जिवंत आहे. ती कराडमध्ये एका तरुणासोबत राहत आहे. हे ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी प्रियकरास त्या विवाहितेला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. दुसऱ्या बाजूने ती विवाहिताच बोलू लागली. पोलिसांना मोठा धक्का बसला.
या माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ प्रियकर आणि कराड येथे गेलेल्या त्या विवाहितेला ताब्यात घेतले. चौकशीअंती संपूर्ण खूनाचा उलगडा झाला. प्रेमासाठी या विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पंढरपूर तालुक्यात फिरणाऱ्या एका वेडसर महिलेची हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला होता, असे समोर आले आहे. पोलिसांनी जळालेली महिला कोण याचा शोध सुरू केला असून, विवाहिता आणि तिचा प्रियकर सध्या मंगळवेढा पोलिसांच्या ताब्यात आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.