मध्यरात्री बायकोला संपवलं, 1 वर्षाची मुलगी आणि 3 मांजराच्या पिल्लांनाही सोडलं नाही, सोलापूर हादरलं

सोलापूरमधून एक धक्कादाकायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने बायको आणि एक वर्षांच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर घरीतील तीन मांजराच्या पिल्लांनाही सोडले नाही. आता कोर्टाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मध्यरात्री बायकोला संपवलं, 1 वर्षाची मुलगी आणि 3 मांजराच्या पिल्लांनाही सोडलं नाही, सोलापूर हादरलं
Solapur Crime
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 21, 2026 | 12:36 PM

दिवसेंदिवस देशात गुन्हेगारीचे सत्र वाढत चालले आहे. अनेक भयानक घटना समोर येताना दिसत आहेत. आता सोलापूर येथे घडलेल्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. एक दिवस त्याने टोकच गाठले. त्याने केलेले कृत्य ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आता नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

सोलापूरमधील मंगळवेढा तालुक्यातील सिद्धनकेरी येथे चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने बायकोचा व एक वर्षाच्या चिमुकलीचा खून केला. खून करणाऱ्या आरोपीला पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीचे नाव संजय नागप्पा कोरे असे आहे.

नेमकं काय घडलं?

संजय कोरे हा बायको सुरेखाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे आणि तिचा शारीरिक व मानसिक छळ करत असे. ३ डिसेंबर २०१७ रोजी रात्रीच्या सुमारास संतापाच्या भरात त्याने लोखंडी कांबीने वार करून सुरेखाची हत्या केली. त्यानंतर झोपलेल्या एक वर्षांची मुलगी श्रावणीच्याही डोक्यात कांबीने वार करून तिचीही निघृण हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, आरोपीने घरातील मांजरीच्या तीन निरपराध पिलांना देखील लोखंडी कांबीने ठेचून क्रूरपणे मारले.

गावकऱ्यांकडे कबुली

घटनेच्या लगेचच आरोपी संजय कोरेने स्वतः गावातील काही ग्रामस्थांकडे गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. न्यायालयाने पत्नी व निष्पाप चिमुकलीच्या हत्येबरोबरच मांजरीच्या तीन पिलांवर केलेल्या क्रूर अत्याचाराची गंभीर दखल घेतली. प्राण्यांवरील क्रूरतेसाठी भादंवि कलम ४२९ अंतर्गत आरोपीला २ वर्षे सक्तमजुरीची स्वतंत्र शिक्षा सुनावली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व उपलब्ध पुरावे विचारात घेत संजय नागप्पा कोरे याला दोषी ठरवण्यात आले. त्याला जन्मठेप व १० हजार रुपयांचा दंड, तसेच प्राण्यांच्या हत्येबद्दल २ वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

तपास व साक्षीदार

या प्रकरणाचा सखोल तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी केला होता. खटल्यादरम्यान सरकारी वकील सारंग वांगीकर यांचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरला. सरकारतर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी सिद्धराम कांबळे, समाधान वाघरे, राहुल कसबे, साधू विपुले, डॉ. भावेश पांडे, डॉ. प्रणत शेटे व पशुवैद्यकीय अधिकारी दत्ता मेटकरी यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. दरम्यान, या प्रकरणातील इतर दोन संशयित नागप्पा कोरे व शारदाबाई कोरे यांना कलम ४९८(अ) अंतर्गत निर्दोष मुक्त करण्यात आले.

Follow Us