वडिलांना म्हणाला अर्ध्या तासात घरी येतो, पण परतलाच नाही; सकाळी वेगळीच बातमी आली !

तरुण मुलगा मध्यरात्रीपर्यंत घरी परतला नाही. बापाने काळजीने फोन केला. मुलाने सांगितले अर्ध्या तासात घरी परततो. पण बाप-लेकाचे हे बोलणे शेवटचे ठरले.

वडिलांना म्हणाला अर्ध्या तासात घरी येतो, पण परतलाच नाही; सकाळी वेगळीच बातमी आली !
एनसीबी अधिकारी असल्याचे सांगत महिला डॉक्टरची फसवणूक
Image Credit source: Google
| Updated on: May 14, 2023 | 12:42 AM

बोकारो : बापाला अर्ध्या तासात घरी येतो सांगितले अन् पुन्हा कधी परतलाच नाही. सकाळी थेट बापाला मुलाच्या मृत्यूची बातमी कळली. बोकारो जिल्ह्यातील बीएस शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर 2 मध्ये ही घटना घडली. येथील एका शाळेच्या आवारात 24 वर्षीय ऑटोचालकाची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याची घटना समोर आली आहे. सकाळी तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेला पाहून लोकांनी त्याच्या वडिलांना याची माहिती दिली. शुभम असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

वडिलांना फोनवर म्हणाला, अर्ध्या तासात येतो

शुभम रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याचे वडील अनिल कुमार यांनी त्याला मध्यरात्री दीडच्या सुमारास फोन केला. यावेळी त्याने वडिलांना अर्ध्या तासात घरी परतत असल्याचे सांगितले. मात्र सकाळपर्यंत तो घरी आलाच नाही. त्यानंतर त्याचा मोबाईलही बंद येऊ लागला. मग सकाळी थेट त्याच्या मृत्यूचीच बातमी आली. शुभमची हत्या झाल्याची शक्यता त्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

मयताच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्या

शुभमची हत्या केल्यानंतर आत्महत्या दर्शवण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवण्यात आला होता. शुभमचे कोणाशीही वैर नव्हते. पण कधी कधी तो दारूच्या नशेत असायचा. संध्याकाळी तो मित्रासोबत दिसला होता, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. मयताच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. पोलीस विविध पैलूंचा तपास करत आहेत.