
पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये नेऊन एका तरूणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. यामुळे फक्त पुण्यातच नव्हे तर अख्ख्या राज्यात संतप्त वातावरण आहे. तरूणीवर एकदा नव्हे तर दोनवेळा अत्याचार करून फरार झालेला आरोपी दत्ता हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 13 पथकं तैनात करण्यात आली आहेत. त्याला पकडून देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे प्रचंड खळबळ माजलेली असतानाच त्याच स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. स्वारगेट आगारात महिला वाहकाचे 30 हजार रुपये चोरीला गेले आहेत. बस आगारात आल्यानंतर महिला वाहकाच्या या पैशांची चोरी झाली. तिकीट विक्रीतून जमा झालेली 30 हजार रुपयांची ही रोकड चोरण्यात आल्याचे उघड झाले. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला कंडक्टर सातारवरून स्वारगेटला बसमधून आली. स्वारगेटवरून परत जाण्या आधीच ती महिला कंडक्टर फ्रेश होण्यासाठी वॉशरूमला गेली होती. मात्र परत आल्यावर बघते तर काय, तिची पैशांची बॅगच चोरीला गेली. स्वारगेट स्थानकात बस आल्यानंतर ती महिला कंडक्टर खाली उतरली, तेव्हा बसमधील सर्व प्रवासीही खाली उतरले होते. मात्र अवघे 3-4 जण बसमध्ये होते. त्याच्यापैकीच कोणीतरी पैशांची ती बॅग लांबवल्याचा संशय त्या महिला कंडक्टरने व्यक्त केला. यासंदर्भात डेपोमध्ये तक्रार नोंदवणार असल्याचे त्यांनी नमूद केलं.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला पकडून देणाऱ्यास 1 लाखाचं बक्षीस
दरम्यान स्वारगेट परिसरात शिवशाही बसमध्ये तरूणीवर अत्याचार करून फरार झालेला आरोपी दत्ता याचा कसून शोध घेण्यात येत आहे. तो शिरूरचा रहिवासी असून त्याच्याविरोधात याआधीही चोरीचे, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांची 13 पथकं त्याचा कसून शोध घेत आहेत. पुणे पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.