पूर्णेकर हत्या प्रकरणात सर्वात मोठं यश, दोन शूटरना अटक, त्या दोन महिलांमुळे… काय होता प्लान?
ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी तिसऱ्याच दिवशी दोन शूटरला मुंबई-गोवा महामार्गावरून अटक केली आहे. संशयित महिलांच्या चौकशीतून हा धागा मिळाला. या अटकेमुळे पूर्णेकर यांच्या हत्येमागील नेमके कारण आणि सूत्रधार कोण, याचा उलगडा होण्यास मदत होणार असून ठाणे गुन्हे शाखेने हे मोठे यश मिळवले आहे.

शिवसेनेचे ठाण्याचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांना सर्वात मोठं यश आलं आहे. अवघ्या तिसऱ्या दिवशीच पोलिसांनी दोन शूटरला अटक केली आहे. या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांचा पुढचा प्लानही समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयित महिलांना ताब्यात घेतलं होतं. या महिलांच्या कसून चौकशीतून या आरोपींचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली आहे. या अटकेमुळे पूर्णेकर हत्येमागचं नेमकं कारण समोर येणार असून इतर आरोपींना पकडणंही सोपं होणार आहे.
ठाणे गुन्हे शाखेने ही मोठी कामगिरी केली आहे. निखिल यादव आणि नितेश पवार या दोन आरोपींना मुंबई-गोवा हायवेवरून अटक करण्यात आली आहे. वाहने बदलून नितेश पवार आणि निखिल यादव हे गोवा येथे जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. फरार आरोपींपैकी हे दोन आरोपी देखील मुख्य आरोपी आहेत. आता या दोघांना अटक केल्यामुळे पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
प्लान काय होता?
या दोन्ही आरोपींना मुंबई- गोवा रोडवर अलिबागजवळ अटक करण्यात आली. गोव्याला पळून जाण्याचा या दोघांचा प्लान होता. मात्र, पोलिसांनी शिताफिने त्यांना पकडल्याने त्यांचा प्लान फसला. पोलिसांनी दोन संशियत आरोपी महिलांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या चौकशीतून या दोघांचा ठावठिकाणा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या दोघांना सापळा रचून अटक केली. या दोघांना अटक करण्यात आल्याने आरोपींची संख्या आता तीनवर गेली आहे.
सूत्रधार सापडणार?
पूर्णेकर हत्या प्रकरणात हे दोघेही शूटर होते. त्यांनी पूर्णेकर यांची हत्या का केली? त्यामागचं कारण काय? राजकीय वादातून हत्या केली? की व्यावसायिक स्पर्धेतून की इतर कारणाने हत्या केली याचा उलगडा होणार आहे. त्याशिवाय हत्या कुणाच्या सांगण्यावरून केली? त्यामागचा सूत्रधार कोण आहे? याचा उलगडाही या दोघांच्या चौकशीतून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या दोघांच्या तपासात काय निघतं? याकडे ठाणेकरांचं लक्ष लागलं आहे.