स्कूटी बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजवला, टोळक्याकडून बसची तोडफोड

नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेची नवी मुंबई कल्याण ही बस सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास नेवाळी मार्गे कल्याणला जात होती.

स्कूटी बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजवला, टोळक्याकडून बसची तोडफोड
हॉर्न वाजवल्यानं टोळक्याकडून एनएमएमटी बसची तोडफोड
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Nov 16, 2022 | 2:40 PM

उल्हासनगर : रस्त्यावरील स्कूटी बाजूला घेण्यासाठी एनएमएमटी बसचालकाने हॉर्न वाजवल्याचा राग आल्यानं टोळक्यानं बसची तोडफोड केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. या टोळक्याने बस चालकालाही मारहाण केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई-कल्याण एसटी नेवाळी मार्गे कल्याण जात होती

नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेची नवी मुंबई कल्याण ही बस सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास नेवाळी मार्गे कल्याणला जात होती. भाल गावात भाल गुरुकुल समोरील कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर बबलू म्हात्रे याने त्याची स्कूटी उभी केली होती.

स्कूटी बाजूला घेण्यासाठी चालकाने हॉर्न वाजवला

ही स्कूटी बाजूला घेण्यासाठी एनएमएमटी चालक अनंत जाधव यांनी बसचा हॉर्न वाजवला. याचा राग आल्यानं भाल गावात राहणाऱ्या बबलू म्हात्रे आणि त्याच्या तीन साथीदारांनी अनंत जाधव यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

तसेच या सरकारी बसचा कॅमेरा आणि समोरची काच तोडून बसचं नुकसान केलं. याप्रकरणी बसचालक अनंत जाधव यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

जाधव यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी बबलू म्हात्रे आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय वाहनाचं नुकसान आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या तिघांनाही अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.