
लखनऊ : लखनऊमध्ये (Lucknow) एका कुटुंबांतील सदस्य लग्नसमारंभाला उपस्थित राहून घरी आले असता त्यांच्या बेडरूममधील दृष्य पाहून चकित झाले. त्या बेडरूममध्ये एक अनोळखी इसम अस्ताव्यस्त झोपला होता आणि त्याच्या आजूबाजूला मद्याच्या बाटल्याही (liquor bottles) पडल्या होत्या. एवढंच नव्हे तर घरातील सर्व सामानही अस्ताव्यस्त पसरले होते. 8 लाखांहून अधिक किमतीच्या मौल्यवान वस्तू गायब (theft) असल्याचेही कुटुंबीयांना आढळून आले. पोलिस तपासादरम्यान या व्यक्तीला त्याच्या चोरीच्या गुन्ह्यातील साथीदाराने मागे सोडले होते, असे समजले. त्या दोघांनी दारूच्या नशेत घर लुटले आणि एक इसम चोरीचा माल घेऊन पळाला. तर दुसरा घरातच झोपून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. लखनऊच्या कँट परिसरात ही घटना घडली.
” लग्न आटोपून परत आल्यानंतर मी कुलूप उघडले तेव्हा मला दिसले की घराच्या गेटचा वरचा भाग तुटलेला होता. घरातील सर्व वस्तू विखुरलेल्या होत्या. मी बेडरूममध्ये पोहोचताच मला एक तरुण आरामात झोपलेला आणि त्याच्या बाजूला दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसल्या,” असे घराचे मालक शरवानंद म्हणाले.
त्यांच्या घरातून 10 तोळे सोनं, सुमारे दीड लाख रुपयांचे चांदीचे दागिने, 50 हजार रुपये किमतीच्या 40 साड्या आणि 6 लाख रुपयांची रोख रक्कम गायब झाल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.
यानंतर शरवानंद यांच्या कुटुंबीयांनी तो चोराचा साथीदार उठण्याची वाट पाहिली आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. सलीम असे त्याचे नाव आहे. तपासादरम्यान त्याने पोलिसांना सांगितले की तो आणि त्याचा साथीदार असे दोघे मिळून चोरी करतात. यावेळी त्यांनी शरवानंद यांच्या घराला लक्ष्य करत तेथे चोरी केली होती.
दोघांनी घरात घुसून मौल्यवान वस्तू शोधल्या, असे सलीमने पोलिसांना सांगितले. त्यानंतर सलीमच्या म्हणण्यानुसार त्याच्या साथीदाराने त्याला घरात साठवलेली दारू पाजली. दारूच्या नशेत सलीम बेडरूममध्ये निघून गेला तर त्याचा साथीदार लुटीचा माल घेऊन पळून गेला. पोलीस आता या साथीदाराचा शोध घेत आहेत.