Bramhose Misfires : ब्रम्होस मिसफायर प्रकरणात हवाई दलाची मोठी कारवाई; तीन अधिकारी बडतर्फ

| Updated on: Aug 23, 2022 | 11:43 PM

चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच मार्च महिन्यात भारताकडून चुकून ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये डागले गेले होते. त्यावर पाकिस्तानने तीव्र आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्या घटनेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले होते.

Bramhose Misfires : ब्रम्होस मिसफायर प्रकरणात हवाई दलाची मोठी कारवाई; तीन अधिकारी बडतर्फ
ब्रम्होस मिसफायर प्रकरणात हवाई दलाची मोठी कारवाई
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : ब्रम्होस क्षेपणास्त्र मिसफायर (Bramhos Misfire) प्रकरणात भारताच्या हवाई दलाकडून मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. क्षेपणास्त्र मिसफायरच्या घटनेनंतर जागतिक पातळीवर त्याचे पडसाद उमटले होते. तसेच पाकिस्तानने घेतलेल्या आक्षेपामुळे भारताने घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी (Inquiry) सुरू केली होती. त्या चौकशीत दोषी आढळलेल्या हवाई दलातील तीन अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ (Dismissed) करण्यात आले आहे. त्यात हवाई दलातील ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर आणि स्क्वाड्रन लीडर या तीन अधिकार्‍यांचा समावेश आहे. मार्चमध्ये भारताचे ब्रम्होस क्षेपणास्त्र एका चुकीमुळे पाकिस्तानात जाऊन कोसळले होते. त्या प्रकरणी हवाई दलाने जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारत ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर आणि स्क्वाड्रन लीडर या तीन अधिकार्‍यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. घटना घडली, त्यावेळी भारताने जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हवाई दलातील तीन अधिकार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

भारताकडून चुकून पाकिस्तानमध्ये डागले ब्रह्मोस क्षेपणास्त्र

चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच मार्च महिन्यात भारताकडून चुकून ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये डागले गेले होते. त्यावर पाकिस्तानने तीव्र आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्या घटनेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटले होते. त्यानंतर भारताने घटनेच्या सखोल चौकशीचे तसेच संबंधित जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार भारतीय हवाई दलाच्या तीन अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ‘ब्रह्मोस क्षेपणास्त्र 9 मार्च 2022 रोजी चुकून डागण्यात आले. घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासह, खटल्यातील तथ्ये प्रस्थापित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशीच्या न्यायालयाला (कर्नल) असे आढळून आले की, अधिकार्‍यांच्या चुकीमुळे ब्रम्होस क्षेपणास्त्र पाकिस्तानात डागले गेले. ते क्षेपणास्त्र पाकिस्तानातील मियाँ चुन्नू शहरात जाऊन कोसळले होते,’ असे हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे.

चौकशी पूर्ण होताच अधिकारी बडतर्फ

तीन अधिकार्‍यांना या घटनेसाठी प्रामुख्याने जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांची सेवा केंद्र सरकारने तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणली आहे. 23 ऑगस्ट रोजी या अधिकार्‍यांना पदावरून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ असे हवाई दलाच्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. ब्रम्होस मिसफायर घडले, त्यावेळी संरक्षण मंत्रालयाने ती घटना ‘अत्यंत खेदजनक’ असल्याचे म्हटले होते. तसेच त्यावेळी तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली होती. ती चौकशी पूर्ण झाल्यानंतर तीन जबाबदार अधिकाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. (Three Air Force officers dismissed in Bramhos misfire case)

हे सुद्धा वाचा