
लग्न करताना आर्थिक स्थिती जितकी महत्त्वाची असते, तितकच मनं जुळणं देखील आवश्यक असतं. कारण पैसा असेल पण मनच जुळली नाही, तर त्या विवाहाला अर्थ उरत नाही. काही जण लग्न करताना फक्त आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवतात. लग्नानंतर मग त्या सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागतात. आपला हेतू साध्य होत नाहीय असं दिसलं की, मग जोडीदाराला त्रास देणं सुरु होतं. त्यातून संसाराची घडी विस्कटते. काही वेळा असे विषय पोलीस ठाण्यापर्यंत जातात. आता रायगड जिल्ह्यात असं तिहेरी तलाकच प्रकरण समोर आलं आहे.
भारतात कायद्याने तिहेरी तलाक प्रथेवर बंदी आहे. पण रायगड जिल्ह्यात एका व्यक्ती पहिली पत्नी असताना दुसऱ्या लग्नाची तयारी करत होता. कुठलीही कायदेशीर मान्यता नसताना फक्त तीन वेळा तलाक, तलाक, तलाक बोलून अब्दुल रहमान इसाने दुसरं लग्न करायला निघालेला. आता महाड पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. पीडित विवाहित महिला नैना अब्दुल रहमान इसाने हिने पती व सासरच्या मंडळी यांच्याकडुन सातत्याने आपला शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची तक्रार महाड मधील बिरवाडी पोलिस ठाण्यात केली होती. यासंदर्भात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नैनाचे पती अब्दुल रेहमानसह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किती कोटी लागणार होते?
अब्दुल रहमान इसाने आणि नैना इसाने यांचा सन 2022 रोजी मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे विवाह सोहळा पार पडला होता. कालांतराने परदेशात आपल्याला व्यवसायाकरीता 1 कोटी रुपये लागणार आहेत, त्यासाठी तुमचा बिरवाडी शहरामध्ये असलेला वडिलांचा फ्लॅट आम्हाला दे, अशी मागणी पीडित विवाहित महिलेकडे करण्यात आली होती. यावरून नैना आणि तिच्या वडिलांनी याला विरोध दर्शविला. यानंतर नैनाच्या पतीने परस्पर दुसर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पती अब्दुल रेहमान इसाने याने आपली फसवणूक करत असल्याने नैनाने महाड बिरवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. अखेर आज याविरोधात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.