रुग्णालयात दाखल पत्नीला पाहून मित्रांसह घरी परतत होता, पण वाटेत गाडीवरील नियंत्रण सुटले अन्…

तिघे मित्र सुट्टीनिमित्त गावी आले होते. एका मित्राच्या पत्नीचे ऑपरेशन झाले होते. तिला पाहण्यासाठी तिघेही कारने रुग्णालयात गेले होते. मात्र तेथून घरी पोहचण्याआधीच वाटेत घात झाला.

रुग्णालयात दाखल पत्नीला पाहून मित्रांसह घरी परतत होता, पण वाटेत गाडीवरील नियंत्रण सुटले अन्...
सांगलीत कारला भीषण अपघात
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 03, 2023 | 10:54 AM

सांगली : पत्नी रुग्णालयात दाखल होती. पत्नीला पहायला मित्रांसोबत कारने गेला होता. रुग्णालयातून घरी परतत असताना गाडीवरील ताबा सुटला. भरधाव कारचा ताबा सुटल्याने कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जत येळवी मार्गावर भुलेश्वर फाट्याच्या पुढे येळवी जवळ हा अपघात झाला. जखमीला पुढील उपचारासाठी सांगलीला हलवण्यात आले आहे. दगडू शंकर करंडे आणि सुखदेव खरात अशी मयतांची नावे आहेत. तर बापू धोंडीबा शिंदे हा गंभीर जखमी आहे. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तिघेही जिवलग मित्र असून, सुट्टीनिमित्त गावी आले

तिघेही सांगोला तालुक्यातील अभिसेवाडी येथील रहिवासी आहेत. तिघेजण जिवलग मित्र असून, ते मुंबईला कंटेनरवर चालक म्हणून कामास आहेत. तिघेही चार दिवस सुट्टीवर गावी आले होते. सुखदेव खरात याच्या पत्नीचे जतमधील एका खाजगी रुग्णालयात पिशवीचे ऑपरेशन झाले होते. तिला पाहण्यासाठी तिघेजण ईरटीगा कारने जतला आले होते.

कारवरील ताबा सुटला अन्…

रुग्णालयातून घरी परत जात असताना घोलेश्वर फाट्याच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर वनीकरणच्या हद्दीजवळ भरधाव वेगात असलेल्या कार गाडीचा ताबा सुटला. कार तीन-चार वेळा पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.