Kalyan Crime : कल्याणात महिला चोरांचा सुळसुळाट, खरेदीच्या बहाण्याने दुकानदाराला गंडा, आरोपी सीसीटीव्हीत कैद

कल्याण-डोंबिवलीत चोरांचा सुळसुळाट झाला आहे. महिला यात मागे नाहीत. महिला चोर सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने घुसून चोरी करुन पळत आहेत.

Kalyan Crime : कल्याणात महिला चोरांचा सुळसुळाट, खरेदीच्या बहाण्याने दुकानदाराला गंडा, आरोपी सीसीटीव्हीत कैद
कल्याणमध्ये चोरट्या बहिणींना बेड्या
Image Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 25, 2023 | 11:53 AM

कल्याण / 25 जुलै 2023 : कल्याणमध्ये चोरांचा सुळसुळाट झाला आहे. यात महिला चोरांची पण कमी नाही. एक घटना कल्याण पश्चिमेतील नारायण वाडीत उघडकीस आली. सोनाऱ्याच्या दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन महिला दुकानात आल्या. त्यांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवत हातचलाखी करत सोन्याच्या अंगठीच्या जागी नकली अंगठी ठेवून बॉक्समधील 4.800 ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी लंपास केली. महिलांची ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली असून, या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र या घटनेनंतर व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

खरेदीच्या बहाण्याने आल्या आणि चोरी करुन गेल्या

कल्याण पश्चिमेकडील स्टेशन रोडला असलेल्या नारायण वाडीत एम.एम. शंखलेशा ज्वेलर्स आहे. रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास या दुकानात दोन महिला खरेदीच्या बहाण्याने आल्या. या महिलांनी दुकानदाराला अंगठी दाखवण्यास सांगितली. अंगठी बघण्याच्या बहाण्याने दुकानदाराला बोलण्यात गुंतवून महिलांनी सोन्याची अंगठी चोरली. त्या जागी नकली अंगठी ठेवली. यानंतर खरेदी न करता त्या दुकानातून निघून गेल्या. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी महिलांचा शोध सुरु

काही वेळाने दुकानातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी आसपासच्या परिसरात महिलांचा शोध घेतला. मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. अखेर दुकान मालकिणीने महात्मा फुले पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपी महिलांचा शोध घेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us