
जगभरात दिवसभरात अनेक घटना घडत असतात. यामध्ये काही घटना या थक्क करणाऱ्या असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत, ज्याने सर्वच जणांना धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर जिल्ह्यातील कांट पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पिझ्झा शॉपच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे एक तरुण आणि एक तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, एका हिंदू संघटनेच्या काही सदस्यांकडून चौकशी आणि घेराव घातल्याने घाबरून दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना बरेली मोड परिसरात घडली असून संबंधित पिझ्झा शॉप दुसऱ्या मजल्यावर होता.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी 21 वर्षांचा तरुण आणि 19 वर्षांची तरुणी पिझ्झा शॉपमध्ये एकत्र बसले होते. त्यांनी ऑर्डर दिली होती आणि ते तेथे बसून ऑर्डरची वाट पाहत होते.
त्याच वेळी एका संघटनेचे काही सदस्य पिझ्झा शॉपमध्ये आले आणि त्यांनी दोघांची चौकशी सुरू केली. त्यांनी तरुण-तरुणीकडे त्यांची जात विचारली. दोघांनी आपण हिंदू असल्याचे सांगितल्यानंतरही, त्या लोकांनी त्यांचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली, अशी माहिती समोर आली आहे.
भीतीपोटी दुसऱ्या मजल्यावरून उडी
या प्रकारामुळे तरुण घाबरला. त्याने खिडकीला असलेली लोखंडी ग्रील काढून टाकली आणि दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्याच्या पाठोपाठ तरुणीनेही खाली उडी घेतली. या उडीत दोघांनाही गंभीर दुखापत झाली.
या घटनेनंतर दोघांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी न्यूज एजन्सी पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, शाहजहांपुरचे पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी सांगितले की, ‘या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. पीडितांकडून अधिकृत तक्रार प्राप्त झाल्यास दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.’
सध्या पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि उपलब्ध व्हिडिओंची तपासणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.