विवाहबाह्य संबंधांमध्ये अडथळा ठरायचा पती, काटा काढण्यासाठी पत्नी रात्री 2 वाजता केलं असं काही, पाहून पोलिसही हादरले
यवतमाळमध्ये धक्कादायक प्रकार! प्रियकरासोबत अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत होता पती. पत्नीने रात्री झोपल्यानंतर 2 वाजता जे केलं ते ऐकून पोलीसही हादरले. नेमकं काय घडलं?

Yavatmal Crime : यवतमाळ जिल्ह्यातून नातेसंबंधांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत संगनमत करून पतीच्या जीवावर उठल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पती हा त्यांच्या कथित अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने त्याला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मात्र, वेळेत पोलिसांना माहिती मिळाल्याने आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
ही घटना पांगरी गाव येथे घडली. वडगाव जंगल पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, पीडित पती गजानन मोरे यांनी पत्नीचे गावातीलच रहिवासी विष्णू कडू आत्राम याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. या संबंधांची माहिती गजानन मोरे यांना माहिती झाल्यानंतर घरात सतत वाद होत असल्याचे सांगितले जात आहे.
पतीला संपवण्यासाठी रचला कट
तक्रारीनुसार, पत्नी कवडी मोरे आणि तिचा कथित प्रियकर विष्णू आत्राम यांनी मिळून गजानन मोरे यांना कायमचे हटवण्याचा कट रचला. 3 मे रोजी मध्यरात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास गजानन मोरे हे घरात झोपलेले असताना पत्नीने अॅल्युमिनियमची तार थेट विजेच्या तारेला जोडून त्यांना करंट दिल्याचा आरोप आहे.
अचानक बसलेल्या जोरदार विजेच्या धक्क्यामुळे गजानन मोरे जागे झाले. या घटनेत त्यांच्या दोन्ही वरच्या हातांना भाजल्याच्या जखमा झाल्या. प्रसंगावधान राखल्यामुळे त्यांचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून तार जप्त केली
घटनेची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलीस ठाणे चे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घरातून विजेची तार तसेच अॅल्युमिनियमची तार जप्त केली. प्राथमिक तपासात संशय बळावल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली.
पत्नी आणि प्रियकराला अटक
तपासानंतर 8 मे रोजी पोलिसांनी आरोपी पत्नी कवडी मोरे आणि तिचा कथित प्रियकर विष्णू आत्राम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोकडे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नातेसंबंधांमधील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.