
घरातील कामावरून झालेल्या वादामुळे तो राग मनात ठेवून एका महिलेने भयानक कृत्य केलं . काम करायला सांगितल्याने रागावलेल्या सुनेने तिच्या सासऱ्याच्या जेवणात विषारी द्रव्य टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब रेवाळे वाडी इथे हा भयानक प्रकार घडला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे विषारी द्रव्य घातलेलं ते अन्न त्याच महिलेच्या पतीनेही खाल्ल्याने त्यालाही बाधा झाली व दोघांचीही तब्येत बिघडली. स्वप्नाली सोलकर (वय 32) असे आरोपी महिलेचे नाव असून देवरूख पोलिसांनी तिला अटक केली आहे. तर सोनालीचा पती आणि सासरे या दोघांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब रेवाळवाडी येथे राहणाऱ्या सचिन सोलकर याचा अवघ्या 3 महिन्यापूर्वी, 13 एप्रिल 2025 रोजी स्वप्नाली हिच्याशी विवाह झाला. मात्र लग्नानंतर सचिनचे बाबा, स्वप्नालीचे सासरे, जगन्नाथ सोलकर हे घरातील केर काढणे, घराची साफसफाई वगैरे, अशी कामं स्वप्नालीकडूनच करून घ्यायचे. मात्र स्वप्नाली हिला ही कामं करायला आवडायची नाहीत. त्याबद्दलच तिच्या मनात खूप राग होता.
आणि तोच राग मनात ठेवून स्वप्नाली हिने सासरे जगन्नाथ यांच्या जेवणात विषारी द्रव्य मिसळलं,अशी माहिती तिचे पती सचिन यांनी पोलिसांना दिली.
नेमकं घडलं काय ?
मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास हा प्रकार घडला. विषारी पदार्थ घातलेलं अन्न खाल्ल्यामुळे साससरे जगन्नाथ व स्वप्नालीचे पती सचिन दोघांनाही अचानक उलट्या व मळमळीसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यांना तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृतीत सुधारणा होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश माईणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक पथकही तिथे दाखल झालं. चौकशी करून पोलिसांनी आरोपी स्वप्नाली हिला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.