मैत्री करून तरूणीचा केला घात, अश्लील व्हिडीओद्वारे केलं ब्लॅकमेल, 6 जणांवर गुन्हा दाखल

कॉलेज विद्यार्थिनीशी मैत्री करून तिला अश्लील व्हिडीओ दाखवत ब्लॅकमेल करणारा तरूण व त्याच्या 6 मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारमतीमधील या प्रकारामुळे मोठी खळबळ माजली आहे.

मैत्री करून तरूणीचा केला घात, अश्लील व्हिडीओद्वारे केलं ब्लॅकमेल, 6 जणांवर गुन्हा दाखल
| Updated on: Jul 04, 2025 | 11:05 AM

एका कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून नंतर तुझे अश्लील व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात घडला आहे. या भयानक प्रकारामुळे आसपासच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ शिंदे, रोहन चाबुकस्वार, सूरज भोसले, हनुमंत शिंदे, विजय मोजगे आणि तुषार जगदाळे अशी नावे असलेल्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी 2025 ते 29 जून 2025 या कालावधीत ही घटना घडली आहे. फिर्यादी विद्यार्थीनीच्या मैत्रिणीने आरोपी पार्थ शिंदे याच्याशी त्या तरूणीची डिसेंबर 2024 मध्ये ओळख करून दिली होती. त्यानंतर पार्थ हा संबंधित विद्यार्थीनीला सातत्याने फोन करायचा, तिच्याशी बोलायचा. त्यातूनच त्यांची चांगली मैत्री झाली. या दरम्यान, दि. 13 जानेवारी 2025 रोजी पीडितेचा वाढदिवस होता. त्यावेळी पार्थ शिंदे हा नीरा येथील ‘हॅशटॅग कॅफे’ येथे त्या तरूणीला भेटला आणि तिच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्याची हिंमत वाढली. 16 जानेवारीला पीडित विद्यार्थिनी कॉलेजमध्ये असतानाच पार्थने पुन्हा तिची भेट घेतली आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असे सांगत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

नकार दिल्यावरही पाठलाग, विनयभंगही केला

मात्र त्या पीडित विद्यार्थिनीने त्याला नकार दिला असता, त्याने तिचा सतत पाठलाग करत पिच्छा पुरवला. याचदरम्यान, करंजेपूल येथील ‘द कॉफी कॅफे’ येथे त्यांची बेट झाल्यावर त्याने नकळत तिचा व्हिडिओ काढला आणि मिठी मारून तिचा विनयभंग केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर पार्थ शिंदे याने पीडितेला व्हॉट्सॲप कॉल केला, तसेच तिचे कपडे काढण्यास भाग पाडत तिचा नग्न व्हिडिओ तयार केला. तू माझ्याशी संबंध ठेवले नाहीत, तर हे व्हिडिओ मी तुझ्या कुटुंबीयांना पाठवेन असं म्हणत तिला धमकी देखील दिली.

एवढं करूनही तो थांबलाच नाही. नंतरही त्याने वेगवेगळ्या नंबरवरुन पीडितेच्या बहिणीला आणि नातेवाईकांना वाढदिवसाचे फोटो, मित्रांसोबतचे फोटो आणि नग्न व्हिडिओ पाठवले. दि. 29 जून रोजी पार्थ शिंदे याच्यासह रोहन चाबुकस्वार, सुरज भोसले, हनुमंत शिंदे, विजय मोजगे आणि तुषार जगदाळे यांनी पीडितेच्या बहिण व नातेवाईकांना वारंवार फोन केले. तुमच्या मुलीने मला फसवलं आहे. आम्ही गेली दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये असून ती अन्य चार-पाच मुलांसोबत रिलेशनमध्ये आहे असं सांगत तिची बदनामी केली. तर रोहन चाबूकस्वार याने पीडितेला फोन करत शिवीगाळ आणि दमदाटी केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर 19 वर्षीय विद्यार्थीनीने वडगाव निंबाळकर पोलिस ठाणं गाठलं आणि फिर्याद नोंदवली. तिच्या फिर्यादीच्या आधारे वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी पार्थ शिंदे (रा. किल्लज, ता. तुळजापूर), रोहन चाबुकस्वार (रा. करंजेपुल, ता. बारामती), सुरज दत्तात्रय भोसले (रा. पुणे), हनुमंत शिंदे (रा. लातूर), विजय मोजगे (रा. किल्लज, ता. तुळजापूर) आणि तुषार जगदाळे (पत्ता माहित नाही) अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता कलम ७४,७५(१),७८, ७९, ३५२, ३५१(२), ३५१ (३), ३ (५), अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (२), ३ (१) थ(ख), (खख)6 आणि माहीती व तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (ई), ६७, ६७(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पोलिस यंत्रणेकडून याबाबत काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.