CBSE 12th Revaluation: अखेर सर्व्हर डाऊनची समस्या संपली, पुनर्मूल्यांकनासाठी कसा कराल अर्ज?

सीबीएसई १२वीचे पुनर्मूल्यांकन पोर्टल (cbseit.in) तांत्रिक बिघाडानंतर पुन्हा सुरू झाले आहे. स्कॅन कॉपीमध्ये झालेल्या गंभीर चुकांमुळे शिक्षण मंत्रालयाने सीबीएसईकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

CBSE 12th Revaluation: अखेर सर्व्हर डाऊनची समस्या संपली, पुनर्मूल्यांकनासाठी कसा कराल अर्ज?
CBSE
| Updated on: Jun 02, 2026 | 8:09 AM

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) बारावीच्या निकालांनंतर सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. तांत्रिक बिघाडामुळे सोमवारपासून बंद पडलेले सीबीएसईचे पुनर्मूल्यांकन पोर्टल (cbseit.in) अखेर मंगळवारी पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पोर्टल ठप्प झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी (Revaluation) अर्ज करणे अशक्य झाले होते, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते. अखेर सीबीएसईने ट्विट (X) करून पोर्टल पूर्ववत झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन टप्प्याटप्प्याने अर्ज करावे, असे आवाहन केले आहे.

तांत्रिक अडचणी आणि मुदतवाढीचा खेळ

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, १ जूनपासून इयत्ता १२वीच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, १ जून रोजी हे पोर्टल पूर्णपणे ठप्प झाले. खरं तर या प्रक्रियेची सुरुवात १९ मे रोजीच झाली होती, ज्यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहण्याची सुविधा देण्यात आली होती. परंतु, पहिल्याच दिवशी लाखो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी लॉगिन केल्यामुळे वेबसाईट क्रॅश झाली. या तांत्रिक अडचणींमुळे मंडळाने आधी अर्ज करण्याची मुदत २२ मे पर्यंत आणि नंतर ती वाढवून २३ मे पर्यंत केली होती. तरीही, प्रचंड गर्दीमुळे विद्यार्थ्यांना लॉगिन करणे किंवा अर्जाचे शुल्क जमा करणे कठीण झाले होते.

सीबीएसईचा ढिसाळ कारभार

यंदा सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची १२वीची परीक्षा दिली आहे. मात्र, बोर्डाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन कॉपी डाऊनलोड केल्यावर अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. यातील अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील महत्त्वाची पाने गायब होती, तर काही पाने अत्यंत अस्पष्ट (Blur) होती. विद्यार्थ्यांनी परीक्षेत घेतलेल्या पुरवण्या (Supplementary Sheets) स्कॅन कॉपीमध्ये जोडलेल्याच नव्हत्या. सर्वात गंभीर बाब म्हणजे, काही विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर दुसऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका अपलोड करण्यात आली होती.

या गंभीर त्रुटींमुळे विद्यार्थी आणि पालकांनी बोर्डाच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप घेतला. हा वाद वाढल्याने अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली असून, सीबीएसई प्रशासनाला धारेवर धरत या संपूर्ण प्रकरणावर लेखी स्पष्टीकरण मागितले आहे.

४ लाख विद्यार्थ्यांनी मागवल्या ११ लाख फोटोकॉपी

सीबीएसईने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, २६ मे पर्यंत बोर्डाकडे स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकांसाठी एकूण ४,०४,३१९ अर्ज प्राप्त झाले होते. या विद्यार्थ्यांनी एकूण ११,३१,९६१ उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींची (Photocopy) मागणी केली होती. या प्रचंड मागणीपैकी सीबीएसईने आतापर्यंत ८,९८,२१४ उत्तरपत्रिका डिजिटल स्वरूपात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी अर्ज कसा करावा?

आता हे पोर्टल पूर्णपणे सुरू झाले असून, ज्या विद्यार्थ्यांना गुणांबद्दल शंका आहे त्यांनी cbseit.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर त्यांना पुनर्मूल्यांकनाचा फॉर्म भरता येऊ शकतो. वेबसाईटवर दिलेल्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रियेचा वापर करून आणि ऑनलाईन शुल्क भरून हा अर्ज सादर करता येईल.

Follow Us