सहायक प्राध्यापक व्हायचंय, पीएच.डीची अट शिथील, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

| Updated on: Oct 03, 2021 | 8:42 AM

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठात नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सहायक प्राध्यापक पदाच्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठा दिलासा दिला आहे.

सहायक प्राध्यापक व्हायचंय, पीएच.डीची अट शिथील, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
Dharmendra Pradhan
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठात नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सहायक प्राध्यापक पदाच्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठा दिलासा दिला आहे. शिक्षणमंत्र्यांनी सहायक प्राध्यापक पदासाठी पीएच. डी.ची आवश्यकता रद्द केली आहे. आता पीएच.डी नसलेल्या नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही सहायक प्राध्यापक पदासाठी नोकरी मिळू शकेल. कोरोना विषाणूमुळे संसर्गामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हा निर्णय घेतला आहे. सहायक प्राध्यापक पदासाठी पीएचडी अनिवार्य असल्याने अनेक उमेदवारांना संधी मिळत नव्हती. विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक पदावर भरतीसाठी पीएचडीची आवश्यकता रद्द केली जाईल, आता पीएचडी नसलेले विद्यार्थीही या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असतील, असं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं

कोरोनामुळं सूट

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी पूर्ण करता आलेली नाही. या कारणामुळं पीएच.डीच्या अटीतून दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी देशातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सहायक प्राध्यापक पदावर भरतीसाठी पीएच.डी अनिवार्य करण्यात आली होती. पण आता ही अट काढून टाकण्यात आली आहे. या निर्णयामुळं रिक्त जागा वेळेवर भरता येतील आणि प्राध्यापक/प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे उच्च शिक्षण संस्थांमधील अध्यापनावर परिणाम होणार नाही.

यूजीसी नेट उत्तीर्ण असणं आवश्यक

महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक पदांवर भरतीसाठी यूजीसी नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. परंतु 2018 मध्ये सरकारने या पदासाठी पीएचडी अनिवार्य केली होती. यानंतर, सरकारने उमेदवारांना पीएचडी पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे दिली होती. आता पदव्युत्तर पदवी आणि राष्ट्रीय पात्रता चाचणी उत्तीर्ण असलेले उमेदवार सहायक प्राध्यापक पदावर भरतीसाठी पात्र असतील. या निर्णयाबाबत यूजीसी लवकरच सर्व उच्च शिक्षण संस्थांना परिपत्रक जारी करेल. यामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठांना सर्व रिक्त जागा लवकर भरण्यास मदत होईल.

नेट परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहेत. यूजीसी नेट परीक्षा 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार होती. बदललेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार असून सकाळी 9 ते 12 या काळात एका बॅचचे पेपर होतील तर दुसऱ्या बॅचचे पेपर दुपारी 3 ते 6 या दरम्यान होतील,अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या:

NTA NEET Phase 2 : नीट फेस 2 परीक्षेची नोंदणी सुरु, 10 ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशनची संधी

UGC NET 2021: यूजीसी नेट परीक्षा पुन्हा लांबणीवर, ‘या’ तारखेपासून परीक्षा

Dharmendra Pradhan said PhD is not mandatory this year for the post of Assistant Professor