Paper Leak Story : नोकरी न देणारं शिक्षण काय कामाचं..? विद्यार्थ्यांसमोर पेपर फुटीचा चक्रव्युह
महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये पेपर फुटीमुळे लाखो बरोजगार तरुणांचे भविष्यपणाला लागले आहे. महाराष्ट्रातही अनेक सरकारी पदांच्या भरतीमध्ये पेपर फुटीने परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मुलांनी वर्षभरात केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. पेपर फुटी का रोखता येत नाही ? कायदा अपुरा की सरकारच गंभीर नाही ? या ज्वलंत विषयाचा घेतलेला आढावा

मुंबई : ‘मी अजून जगू इच्छीत नाही, माझा जीव आता कशातच रमत नाही. माझ्या मृत्यूनंतर कोणालाही त्रास देऊ नका…मी माझ्या बीएससीच्या पदव्या जाळत आहे. अशा पदव्यांचा काय उपयोग ज्या नोकरी देऊ शकत नाहीत…दुर्दैवी बृजेश पाल या तरुणाच्या सुसाईड नोटमधील या ओळी आहेत. ज्याने पेपर फुटीनंतर निराश होऊन जीव दिला होता. तरुणांनी सरकारी नोकरीच्या आशेवर दीड दोन वर्षे अभ्यास करायचा, काही लोकांच्या स्वार्थीवृत्तीने ‘पेपर लीक’ होण्याची शिक्षा देशाभरातील होतकरू तरुणांना मिळत आहे. त्यांच्या परीक्षा रद्द होऊन पुन्हा दुसऱ्या परीक्षेची वाट पाहाणे नशिबात उरत आहे. त्यामुळे अनेक तरुणांचे नोकरीचे वय उलटत आहे. सुंगधी अत्तरासाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील कन्नोज येथील तरुणाची ही कहाणी… देशातील मजबूर बेरोजगार तरुणांची जणू व्यथाच कथन करीत आहे. भारतात साऱ्यांनाच सरकारी नोकरीची आशा असते. तशी बृजेशच्या पालकांनाही मुलगा सरकारी नोकरीत लागून आपल्या कष्टाचे पांग फेडेल अशी आशा होती. परंतू त्यांच्या हातात त्याची सुसाईड नोटच पडली… ...
