शिवाजी विद्यापीठाचा मोठा निर्णय, परीक्षा अर्जाचं विलंब, अतिविलंब शुल्क न घेण्याचे महाविद्यालयांना आदेश

विद्यापीठाकडे विद्यार्थी संघटनांनी एसटीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर नियमित अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. अखेर शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळानं विलंब आणि अतिविलंब शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवाजी विद्यापीठाचा मोठा निर्णय, परीक्षा अर्जाचं विलंब, अतिविलंब शुल्क न घेण्याचे महाविद्यालयांना आदेश
शिवाजी वि्द्यापीठ, कोल्हापूर
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 6:50 AM

कोल्हापूर: शिवाजी विद्यापाठ, कोल्हापूरमध्ये (Shivaji University Kolhapur) सध्या सत्र परीक्षांचे (Semester Exam Form Submission) अर्ज दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. शिवाजी विद्यापीठाकडून परीक्षांचे अर्ज भरुन घेण्यासाठी विविध तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानुसार 26 नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांमध्ये अर्ज नियमित शुल्कासह दाखल करावेत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यापीठाकडे विद्यार्थी संघटनांनी एसटीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर नियमित अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. अखेर शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळानं विलंब आणि अतिविलंब शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविद्यालयांना परीक्षा शुल्क न घेण्याचे आदेश

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या परीक्षा विभागाच्यावतीनं यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर सत्र परीक्षा 2021 साठी विलंब शुल्क आणि अतिविलंब शुल्कात शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांनी परीक्षा अर्ज विहित मुदतीत भरुन घ्यावेत. विद्यार्थ्यांकडून कोणतंही विलंब आणि अतिविलंब शुल्क आकारु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

निर्णयाची विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे आदेश

ऑक्टोबर नोव्हेंबर सत्रातील परीक्षा अर्ज दाखल करण्यासाठी निश्चित करण्यात आलेलं विलंब शुल्क आणि अतिविलंब शुल्क रद्द करण्यात आल्याची माहिती शिक्षक आणि विद्यार्थ्यांना करुन द्यावी, असं आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आलं आहे.

नियमित शुल्कासह अर्ज घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त प्रवास खर्च देऊन अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयात यावं लागत होतं. विद्यार्थ्यांनी नियमित परीक्षा शुल्कासह अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. विलंब शुल्क आणि अतिविलंब शुल्क न घेण्याचा निर्णय घेत विद्यापीठानं अप्रत्यक्षपणे नियमित शुल्कामध्येच अर्ज भरण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली आहे. या निर्णयाचा फायदा, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे.

इतर बातम्या:

15 डिसेंबरपसून भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पुन्हा सामान्य होणार, मात्र नवीन कोविड स्ट्रेनमुळे ‘या’ 14 देशांना वगळलं

MPSC Chairman | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती

Shivaji University decided to not take late fee and Super late fee for october november semester exam 2021