
सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आशियातील सर्वात श्रीमंत समजली जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा गड कोण सर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे मनसे-उद्धव सेना तर दुसरीकडे भाजप-शिंदे यांच्यामध्ये चांगलीच कलगीतुरा रंगायला सुरुवात झाली आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. शेवटच्या क्षणापर्यंत अनेकठिकाणी यावरुन गोंधळ पाहायला मिळाला. मुंबईत एकूण 2516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 16 जानेवारीला कोणी महापालिकेचा गड सर केला हे कळेलच. दरम्यान, कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटल्याचे दिसत आहे. कृपाशंकर सिंह हे भाजपाचा मुंबईतील उत्तर भारतीय चेहरा आहेत. पण निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
कृपाशंकर सिंह नेमकं काय म्हणाले?
कृपाशंकर सिंह यांनी उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असे वक्तव्य केले. मिरा भाईंदरसह 29 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असा विश्वासह कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केला आहे. ‘उतर भारतीय नगरसेवक येणार. आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय समाजाचा महापौर बनेल’ असे कृपाशंकर म्हणाले. त्यानंतर वाद निर्माण झाला आहे. सचिन आहिर यांनी कृपाशंकर सिंह यांच्यावर टीका केली आहे.
सचिन अहिर यांची जोरदार टीका
कृपाशंकर सिंह यांचे वक्तव्य मराठी माणसाला अपमानीत करण्याचे असल्याचे सचिन अहिर यांनी म्हटले आहे. यांचा माज निवडणूकीमध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील सचिन अहिर यांनी दिला आहे. ‘भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेल्या नेत्यांची एवढी हिंम्मत, म्हणजे हा एका प्रकारे माज आहे का? कारण आम्ही एवढी संख्या आणून किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्या प्रकारे चेतावनी देता किंबहुना एका प्रकारे आव्हानात्मक बोलले जाते मला असे वाटते यातूनच कळतय की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवर प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषेची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावर अपमानीत करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्यांचा हा माज मतदार निश्चितपणे या निवडणूकीत उतरवल्याशिवाय राहणार नाहीत’ असे सचिन अहिर म्हणाले.