Maharashtra Election 2025 Postponed : नगरपालिका, नगरपरिषदांची उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलली, मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Election 2025 Postponed : महाराष्ट्रातील राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते यांना झटका देणारा निकाल आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उद्याची मतमोजणी पुढे ढकलली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत.

Maharashtra Election 2025 Postponed : नगरपालिका, नगरपरिषदांची उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलली, मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis
Updated on: Dec 02, 2025 | 1:07 PM

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज एक मोठा निर्णय दिला. महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु आहेत. आज मतदान होत आहे. उद्या मतमोजणी आहे. मात्र, नागपूर खंडपीठाने आज सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिला. हा निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी मोठा झटका आहे. या निकालावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कारण उद्या होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे.

“नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल अजून मी वाचलेला नाही. मागची 25-30 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय. हे पहिल्यांदा असं घडतय, घोषित झालेल्या निवडणुका, निकाल पुढे जात आहे. मला ही सगळी पद्धत फार योग्य वाटत नाही. खंडपीठ स्वायत्त आहे. त्यांचा निकाल मान्य करावा लागेल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “इलेक्शन कमिशन सुद्धा स्वायत्त आहे. जे उमेदवार मेहनत करतात, प्रचार करतात त्यांचा भ्रमनिरास होतो. व्यवस्थेच्या फेल्युरमुळे काही चुकीचं नसताना अशा गोष्टी होणं योग्य नाही. पुढे अजून खूप निवडणुका निवडणूक आयोगाला घ्यायच्या आहेत. पुढच्या निवडणूक प्रक्रियेसाठी आयोगाने सुधार केला पाहिजे. पुढच्या निवडणुकीत असं होणार नाही हे पाहिलं पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे काय म्हणाले?

राज्य निवडणूक आयोगाची चूक वाटते का? त्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. “माझा मत असं आहे की,मी चूक म्हणणार नाही. जो काही कायदा आहे, त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचे वकिल कोण आहेत, मला माहित नाही. चुकीचा अर्थ काढला आहे. इतकी वर्ष निवडणुका आम्ही लढवतोय. नियम माहिती आहेत, वकिलांशी मी बोललो आहे,माझ्या मते चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. ज्या ठिकाणी सगळ्या निवडणूक प्रक्रियेच पालन झालय, अशा ठिकाणी कोणातरी एक कोर्टात गेला, त्याला कोर्टाने दिलासा दिला नाही. पण तो कोर्टात गेला म्हणून निवडणुका पुढे ढकलायच्या हे माझ्या तत्वात बसत नाही. माझी व्यक्तिगत नाराजी नाही, कायद्याच्या आधारावर नाराजी आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्याची मतमोजणी पुढे गेली, हे योग्य वाटत नाही असं फडणवीस म्हणाले.