
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने नितीशकुमार यांना दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं असून नितीशकुमार पुन्हा एकदा बिहारच्या गादीवर विराजमान होणार असल्याचे म्हटले जात आहे. नितीशकुमार यांच्या या दणदणीत विजयामागे सर्वात मोठं कारण ठरलं ते म्हणजे राज्यातील तब्बल 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यात थेट 10-10 हजार रुपये जमा करणारी योजना!
बिहारमध्ये महिलांच्या खात्यात थेट 10-10 हजार रुपये जमा करणाऱ्या योजनेला ‘मुख्यमंत्री महिला उद्योजिका योजना’ असं नाव देण्यात आलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर 29 ऑगस्ट 2025 रोजी नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली होती. विरोधकांनी यावर “मतांची खरेदी” असा आरोप केला होता, पण निकालाने सिद्ध केलं की ही योजना नितीश सरकारवरील नाराजी पूर्णपणे पुसून टाकणारी ठरली.
बिहारमध्ये एकूण महिला मतदार 3.6 कोटी आहेत. त्यापैकी 1.5 कोटी महिलांच्या खात्यात थेट 10000 रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या बिहारमधील निवडणूकीत महिला मतदारांची संख्या 71 टक्क्यांनी वाढली. या योजनेचा नितीशकुमार यांना चांगलाच फायदा झाल्याचे म्हटले जात आहे. अप्रत्यक्षपणे या योजनेचा 4 ते 5 कोटी कुटुंबावर झाला आहे. ही रक्कम परत करायची नाही, ते कोणतेही कर्ज नाही हे कळाल्यानंतर महिला आनंदी होत्या. महिलांनी यातून छोटा व्यवसाय, दुकान किंवा स्वयंरोजगार उभा केल्यास पुढे २ लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त कर्ज मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 ऑक्टोबर 2025 रोजी व्हर्च्युअल पद्धतीने या योजनेचं उद्घाटन केलं आणि पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले. नंतर हा आकडा 1.5 कोटीपर्यंत पोहोचला. नितीशकुमार यांनी आजपर्यंत महिलांना अनेक सवलती दिल्या आहेत. मुलींना मोफत सायकल, पंचायतीत 50 टक्के आरक्षण, सरकारी नोकरीमध्ये 35 टक्के महिलांना आरक्षण, आणि आता थेट बँकेत 10 हजरा रुपये. या सर्व योजनांमुळे बिहारच्या महिलांमध्ये नितीशकुमारांबाबत प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. यावेळी त्यांनी केवळ घोषणा केली नाही तर ती प्रत्यक्षात उतरवलीही. त्यामुळेच महिला मतदारांनी एनडीएला भरघोस साथ दिली.
नितीशकुमार : दहाव्यांदा मुख्यमंत्री?
नितीशकुमार हे आता दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा त्यांनी 3 मार्च 2000 साली शपथ घेतली होती. केवळ सात दिवस ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2005, 2010, 2015, 2017, 2020,2022, 2024 आणि आता दहाव्यांदा ते मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यांनी 20 वर्षांहून अधिककाळ मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. ते भारतातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे यावेळीही त्यांना मुख्यमंत्री पद देण्याची शक्यता आहे. बिहारच्या राजकारणात नितीशकुमारांनी अनेकदा पक्ष बदलले, आघाड्या बदलल्या, तरी जनतेने विशेषतः महिलांनी त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवला.