गाणं पाहिजे तर असं, जे कितीही वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, आजही प्रत्येक पार्टीत वाजतं

अमिताभ बच्चन यांचं 1981 मधील सर्वात लोकप्रिय गाणं, ज्याची शूटिंग पाहण्यासाठी स्टेडियमवर जमलेली लाखोंची गर्दी. गाणं इतकं सुपरहिट की आजही ऐकताच अनेकजण धरतात ठेका.

गाणं पाहिजे तर असं, जे कितीही वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, आजही प्रत्येक पार्टीत वाजतं
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 15, 2026 | 3:46 PM

बॉलिवूडच्या इतिहासातील काही गाणी केवळ त्यांच्या संगीतामुळे किंवा कलाकारांच्या अभिनयामुळेच नाही तर त्यांच्या शूटिंगमागील भन्नाट किस्स्यांमुळेही कायम लक्षात राहतात. अमिताभ बच्चन यांच्या 1981 साली प्रदर्शित झालेल्या ‘याराना’ चित्रपटातील ‘सारा जमाना हसीनों का दीवाना’ हे गाणं त्यापैकीच एक आहे.

किशोर कुमार यांच्या आवाजातील, अंजान यांनी लिहिलेलं आणि राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आजही प्रचंड लोकप्रिय आहे. गाण्यात अमिताभ बच्चन यांनी घातलेले बल्ब लावलेले चमकदार जॅकेटही विशेष चर्चेत आले होते. मात्र या गाण्याच्या शूटिंगदरम्यान घडलेला किस्सा त्याहूनही भन्नाट आहे.

अमिताभ यांना पाहण्यासाठी जमली होती प्रचंड गर्दी

‘सारा जमाना’ या गाण्याचं शूटिंग कोलकात्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या नेताजी सुभाष इंडोर स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. गाण्यात खऱ्या प्रेक्षकांचा उत्साह आणि वातावरण दिसावं, अशी कल्पना अमिताभ बच्चन यांची होती. मात्र शूटिंगसाठी आलेली गर्दी अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने वाढली.

अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, स्टेडियमची क्षमता जवळपास 12 हजार लोकांची होती; मात्र शूटिंग पाहण्यासाठी तब्बल 50 हजारांहून अधिक लोक स्टेडियममध्ये दाखल झाले होते तर जवळपास तेवढीच गर्दी बाहेरही जमली होती.

गर्दी वाढत गेल्याने परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर जाण्याची वेळ आली. अमिताभ यांना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा उत्साह इतका वाढला की काही लोकांनी स्टेडियममधील सिमेंटच्या सीट्स उखडून मैदानाच्या दिशेने फेकल्या, असंही सांगितलं जातं. त्यामुळे शूटिंगदरम्यान सुरक्षाव्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं.

बल्ब असलेल्या जॅकेटमागेही अमिताभ यांचीच कल्पना

या गाण्यात अमिताभ बच्चन यांनी परिधान केलेलं काळ्या रंगाचं बल्ब लावलेलं जॅकेट आजही त्यांच्या आयकॉनिक लूकपैकी एक मानलं जातं. विशेष म्हणजे, या अनोख्या पोशाखाची कल्पनाही अमिताभ यांचीच होती.

स्टेजवर नाचताना कपड्यांवरील छोटे-छोटे बल्ब चमकताना दिसावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार हे विशेष जॅकेट तयार करण्यात आलं. मात्र हे जॅकेट परिधान करून नाचणं अमिताभ यांच्यासाठी सोपं नव्हतं.

‘कौन बनेगा करोडपती’च्या एका भागात त्यांनी या जॅकेटशी संबंधित मजेदार किस्सा सांगितला होता. जॅकेटमध्ये करंट गेल्यावर आपोआप शरीराला झटके बसायचे आणि त्यामुळे आपण नाचू लागायचो, असं अमिताभ यांनी गंमतीने सांगितलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us