
'परदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री महिमा चौधरी सुरुवातीला म्युझिक चॅनलमध्ये व्हीजे म्हणून काम करायची. दिग्दर्शक सुभाष घई यांनी तिला बॉलिवूडमध्ये लाँच केलं. महिमाचं खरं नाव रितू चौधरी आहे. सुभाष घई यांनी तिचं नाव बदललं.

बॉलिवूडमध्ये करिअरच्या शिखरावर असताना अचानक महिमा इंडस्ट्रीपासून दूर गेली. 1999 मध्ये 'दिल क्या करे' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बेंगळुरूमध्ये महिमाच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात असंख्य काचेचे तुकडे महिमाच्या चेहऱ्यावर रुतले गेले.

"बेंगळुरूमधील शूटिंगचा तो शेवटचा दिवस होता. मी पहाटे शूटिंगसाठी माझ्या कारने निघाले. त्याचवेळी चुकीच्या दिशेने येणारा दूधाचा ट्रक माझ्या कारला धडकला. अपघातात काचेचे तुकडे जणू बुलेटप्रमाणे माझ्या चेहऱ्यावर रुतले गेले", असा अनुभव महिमाने सांगितला.

सर्जरीदरम्यान महिमाच्या चेहऱ्यावरून 67 काचेचे तुकडे काढण्यात आले होते. त्यावेळी या अपघाताबद्दल बोलण्यास खूप घाबरल्याचं महिमाने स्पष्ट केलं. कोणीच आपल्याला समजून घेणार नाही, पाठिंबा देणार नाही, असं तिला वाटलं होतं.

त्या कठीण काळात अभिनेता अजय देवगणने खूप साथ दिल्याचं महिमाने सांगितलं. शूटिंगदरम्यान अजयने खूप काळजी घेतली आणि त्याने मला पुरेसा वेळसुद्धा दिला होता, असं ती म्हणाली.