संगीतकार ए.आर. रहमान यांना मातृशोक, सोशल मीडियाद्वारे दिली दुखःद बातमी

| Updated on: Dec 28, 2020 | 4:22 PM

ए.आर. रहमान यांची आई करीमा बेगम गेल्या काही काळापासून आजारी होत्या.

संगीतकार ए.आर. रहमान यांना मातृशोक, सोशल मीडियाद्वारे दिली दुखःद बातमी
Follow us on

मुंबई : ‘ऑस्कर’ विजेता गायक-संगीतकार ए.आर.रहमान यांच्या आईचे आज (28 डिसेंबर) निधन झाले आहे. खुद्द रहमान यांनीच सोशल मीडियाद्वारे ही दुखःद बातमी चात्यांशी शेअर केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी आपल्या आईचा फोटो शेअर केला आहे. ए.आर. रहमान यांची आई करीमा बेगम गेल्या काही काळापासून आजारी होत्या. रहमान त्यांच्या आईच्या खूप जवळ होते. त्यामुळे आई गेल्यानंतर रहमान यांना शोक अनावर झाला होता (A R Rahman Mother Kareema Begum passed away).

प्रत्येक खास प्रसंगी रहमान आपल्या आईचा उल्लेख करत. आपल्या आईनेच आपल्यातले संगीत आणि आपले कलागुण ओळखले, असे रहमान नेहमी म्हणत. स्वतःच्या संपूर्ण यशाचं श्रेय त्यांनी करीमा बेगम यांना दिलं  होतं.

वडिलांच्या निधनानंतर आईने सांभाळले!

ए.आर.रहमान यांचे खरे नाव दिलीप कुमार होते. तर, त्यांच्या आईचे नाव कस्तुरी होती. पुढे काही कारणांनी त्यांनी ही नवे बदलली. रहमान यांचे वडील देखील संगीतकार होते. रहमान नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. अशावेळी त्यांच्यावर अनेक आर्थिक संकटे ओढवली होती. तेव्हा करीमा बेगम यांनी पतीची सगळी वाद्ये भाड्याने देऊन घर चालवण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी त्यांनी ही वाद्ये विकण्याचा सल्ला दिला होता. मात्र, माझा मुलगा मोठा होऊन त्याच्या वडिलांची परंपरा चालवेल, असे म्हणत त्यांनी हे सल्ले धुडकावून लावले होते (A R Rahman Mother Kareema Begum passed away).

वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी रहमान यांच्या आईने त्याच्यांतील कलागुण ओळखले होते. करीमा बेगम यांना देखील संगीताची जाण होती. अकरावीत असतानाच त्यांनी रहमान यांना संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचा सल्ला दिला होता. आपला मुलगा फक्त संगीत विश्वातच चमकू शकतो, असा विश्वास त्यांना होता.

आमचं नातं चित्रपटात दाखवतात तसं नव्हतं!

एका मुलाखती दरम्यान ए.आर. रहमान यांनी आपल्या आईविषयी अनेक गोष्टी सांगितली होत्या. ‘आमचं नातं चित्रपटात दाखवतात तसं नव्हतं. आम्ही कधी एकमेकांची गळाभेट घ्यायचो नाही. तरीही तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं. मझ्यासाठी काय योग्य हे तिलाच जास्ती ठावूक होतं,’ असे ए.आर.रहमान म्हणाले.

सोशल मीडियावर रहमान यांनी ही दुखःद बातमी शेअर करताच त्यांच्या चाहत्यांनी यावर कमेंट करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या चाहते देखील लाडक्या संगीतकारच्या दुःखात सामील झाली आहेत.

(A R Rahman Mother Kareema Begum passed away)