लाडक्या लेकीच्या लग्नात आमिर खानच्या डोळ्यात तरळले अश्रू; भावूक करणारा क्षण

लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अत्यंत खास क्षण असतो. आपल्या लाडक्या लेकीची पाठवणी करताना आईवडिलांसह कुटुंबीयांना अश्रू अनावर होतात. असाच भावूक क्षण आमिर खानची मुलगी आयरा खानच्या लग्नात पहायला मिळाला. यावेळी आमिरचे डोळे पाणावले होते.

लाडक्या लेकीच्या लग्नात आमिर खानच्या डोळ्यात तरळले अश्रू; भावूक करणारा क्षण
Aamir Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 12, 2024 | 9:19 AM

उदयपूर : 12 जानेवारी 2024 | लेकीचं लग्न हा प्रत्येक आईवडिलांसाठी जितका आनंदाचा क्षण असतो, तितकाच तो भावनिकही असतो. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने याआधीच्या मुलाखतींमध्ये लेक आयरा खानच्या लग्नाविषयी त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तिच्या लग्नाच्या दिवशी मी खूप रडेन, असं तो म्हणाला होता. राजस्थानमधील उदयपूरमध्ये आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी धूमधडाक्यात लग्न केलं. गेल्या आठवड्यात मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर उदयपूरमध्ये दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने एकमेकांना आयुष्याभराची साथ देण्याचं वचन दिलं. यावेळी आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता जेव्हा मुलीचा हात धरून घेऊन येत होते, तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. इतकंच नव्हे तर आयरा आणि नुपूर एकमेकांना अंगठी घालतानाही आमिरचे डोळे पाणावले होते.

आयरा आणि नुपूरच्या लग्नातील हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयराच्या लग्नापूर्वी दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला होता, “मी तर खूप भावूक होतो. त्यादिवशी मी खूप रडणार हे तर नक्की आहे. कुटुंबीयांमध्ये आधीच चर्चा सुरू झाली आहे की त्यादिवशी आमिरला सांभाळा. कारण त्याच्यासाठी हा खूप भावूक क्षण असेल. मी माझं हास्य किंवा अश्रू यांवर नियंत्रण आणू शकत नाही.” आयरा आणि नुपूरच्या लग्नाला दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार उपस्थित होते. लग्नानंतर आमिर खान, त्याची पहिली पत्नी रिना दत्ता, मुलगी आयरा, मुलगा जुनैद, जावई नुपूर शिखरे आणि त्याची आई हे सर्व मिळून मिठी मारताना दिसले.

पहा व्हिडीओ

आयरा-नुपूरच्या संगीत समारंभात आमिर खानने त्याची पूर्व पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद यांच्यासोबत मिळून खास गाणं गायलं होतं. त्याचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आयरा आणि नुपूर यांनी सप्टेंबर 2022 मध्ये साखरपुडा केला होता. आयरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. तर नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना त्याने फिटनेस ट्रेनिंग दिली आहे. यात आमिर खान आणि सुष्मिता सेन यांचाही समावेश आहे.