
गेल्या काही दिवसांपासून ‘3 इडियट्स’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सीक्वेलची जोरदार चर्चा आहे. 2009 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. दिग्दर्शक राजकुमार हिरानी आता त्याच्या सीक्वेलवर काम करत असल्याचं म्हटलं जात होतं. तर आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी हे तिघेही मुख्य कलाकार सीक्वेलमध्येही काम करणार इच्छुक असल्याची चर्चा होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सीक्वेलच्या चर्चांवर आमिर खान आणि आर. माधवनने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटसाठी सुभाष के. झा यांना दिलेल्या मुलाखतीत आर. माधवन म्हणाला, “थ्री इडियट्सचा सीक्वेल बनवायला चांगलं वाटेल, पण हे थोडं विचित्रही वाटतं. कारण आम्ही तिघंही आमिर, शर्मन आणि मी आता बरेच म्हातारे झालो आहोत. सीक्वेलमध्ये कुठे जाणार? आता आमचं आयुष्य कसं असेल? ही एक मनोरंजक कल्पना आहे. पण त्यामुळे चांगला सीक्वेल मिळणं कठीण आहे. मला राजू हिरानींसोबत पुन्हा काम करायला आवडेल. पण ‘3 इडियट्स’ पुन्हा? मला वाटतं की हे मूर्खपणाचं ठरेल.”
याविषयी आमिरनेही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “मला थ्री इडियट्सचा सीक्वेल करायला आवडेल, पण याबद्दल मी कोणाशीही संपर्क साधलेला नाही. तो चित्रपट बनवताना आम्हाला खूप मजा आली होती. माझं रँचो हे पात्र कायम माझ्या आवडीचं असेल. लोक अजूनही रँचोबद्दल बोलतात. तर होय, मला सीक्वेल करायला आवडेल. पण कोणीही माझ्याशी त्यासाठी संपर्क साधला नाही.”
आमिर, माधवन आणि शर्मन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘3 इडियट्स’ हा चित्रपट जगभरात 400 कोटी रुपयांचा गल्ला जमवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने परदेशात बॉक्स ऑफिस कमाईचे नवे विक्रम रचले होते. भारतातही हा चित्रपट बऱ्याच काळापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. यामध्ये बोमन ईराणी, करीना कपूर, ओमी वैद्य आणि मोना सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन मित्रांची कहाणी यात दाखवण्यात आली होती.