Aamir Khan | ‘या’ चित्रपटातून आमिर करणार मोठ्या पडद्यावर पुनरागमन ? नववर्षात शूटिंग सुरू होण्याची शक्यता

विश्रांतीनंतर मि. परफेक्शनिस्ट आमिर खान हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यास तयार झाला आहे. लाल सिंग चढ्ढा चित्रपट फ्लॉप झाल्यापासून तो ब्रेकवर होता. पण आता तो नव्या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त झाला आहे.

Aamir Khan | या चित्रपटातून आमिर करणार मोठ्या पडद्यावर पुनरागमन ? नववर्षात शूटिंग सुरू होण्याची शक्यता
| Updated on: Aug 29, 2023 | 3:22 PM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये मि. परफेक्शनिस्ट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खानच्या (aamir khan) चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर आमिर आता पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. लाल सिंग चढ्ढा हा त्याचा महत्वाकांक्षी चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिरने काही काळ ब्रेक घेत मनोरंजन (entertainment) सृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याचा विश्रांतीचा काळ आता संपला असून त्याने आता त्याच्या नव्या चित्रपटावर काम करण्यास सुरूवात केल्याचे वृत्त समोर आले आहे. एवढेच नव्हे तर आमिरच्या या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही लॉक करण्यात आहे.

आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत बनणाऱ्या या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार, आमिर खान हा प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. पण यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

फिल्म ट्रेड ॲनलिस्ट तरण आदर्श यांनी यांसदर्भात एका ट्विटद्वारे दावा केला आहे की आमिरच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गतच त्याचा पुढला चित्रपट बनवण्यात येणार आहे. हा त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचा 16वा चित्रपट असेल. त्याचे प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू झाले असून नव्या वर्षात चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. पण चित्रपटाचं नाव काय, तो दिग्दर्शित कोण करणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या कलाकाराची भूमिका असेल याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही.

 

कधी रिलीज होणार चित्रपट ?

रिपोर्ट्सनुसार, आमिरचा हा आगामी चित्रपट पुढल्या वर्षी ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये आमिर खानचा बहुचर्चित लाल सिंग चढ्ढा चित्रपट प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफीसवर त्याची जादू काही खास चालली नाही.