
ठाण्यातील घोडबंदर इथल्या गायमुख घाटात शुक्रवारी सकाळी तब्बल 14 वाहनांची एकमेकांशी धडक झाली. घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असताना काही हलकी वाहनं या मार्गावरून विरुद्ध दिशेने येत होती. अखेर नियंत्रण सुटल्याने ही वाहनं एकमेकांवर आदळली आणि अपघात झाला. विरुद्ध दिशेला गाडी टाकल्यामुळे अपघात झाला, असं म्हणून सरकारनं कृपया हात झटकू नये, असं लिहित मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेनं या अपघाताचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर आता अभिनेता आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत आली आहे. आस्तादने या अपघातासाठी बेजबाबदार नागरिक कारणीभूत असल्याचं म्हटलंय. अपघातात चेंगरून गेलेल्या गाडीसोबत काहीजण फोटो आणि सेल्फी काढत असल्याचंही त्याने म्हटलंय.
‘आता शूटिंगला येताना पाहिलेलं दृश्य.. घोडबंदर रोड हा माझा रोजचा कामाला येण्याचा मार्ग आहे. काल नशिबाने मला सुट्टी असल्याने काल गायमुख इथं झालेल्या अपघातात मी सापडलोही नाही आणि नंतरच्या कोंडीत अडकलोही नाही. आज ते वळण जवळ आलं तसं छातीत बारीक धस्सही झालं. तर तिथे कालच्या अपघातात पार चेंगरून गेलेली एक पांढरी वॅनगर गाडी बाजूला फुटपाथवरून उचलून ठेवली आहे. त्याच वळणावर आज पुन्हा थोडी गर्दी होती. तीन चारचाकी गाड्या, आणि सात ते आठ दुचाकी अशी वाहनं थांबली होती. त्यातली/त्यांवरील माणसं उभी होती.. कशासाठी? त्या वॅगनरचे आणि तिच्याबरोबर स्वत:चे फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी. हा आपला ‘सिविक सेन्स’ (नागरिक भावना) आहे. फक्त सरकार आणि यंत्रणेला दोष देऊन नाहीच चालणार’, अशी पोस्ट आस्तादने लिहिली आहे. या पोस्टच्या अखेरीस त्याने नमूद केलं की, ‘आजही चुकीच्या बाजूने वाहनं येतच होती. फार रहदारी नसतानाही.’
आस्तादच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आपल्याकडे नागरिकशास्त्र 100 गुणांना करायला हवं आणि त्याच्या प्रॅक्टिकल्सनाही 100 मार्क्स असायला हवे’ असं एकाने लिहिलं. तर ‘मित्रा, सिविक सेन्स फार मोठे दोन शब्द आहेत. समजले तर बरे नाहीतर कठीण आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘पालथ्या घडावर पाणी आहे’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी मतं मांडली आहेत.