‘अथक मेहनत करून रोज..’; अवघ्या सहा महिन्यांत मालिकेनं गुंडाळला गाशा, अभिनेत्रीची भावूक पोस्ट

मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेने अवघ्या सहा महिन्यांत गाशा गुंडाळला आहे. या मालिकेतील अभिनेत्रीने याबाबत सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

अथक मेहनत करून रोज..; अवघ्या सहा महिन्यांत मालिकेनं गुंडाळला गाशा, अभिनेत्रीची भावूक पोस्ट
अबीर गुलाल मालिकेतील कलाकार
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2024 | 10:10 AM

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ ही मालिका अवघ्या सहा महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. यामध्ये अक्षय केळकर, पायल जाधव आणि गायत्री दातार यांच्या मुख्य भूमिका आहेत. मे महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटील आली होती. आता लवकरच या मालिकेचा शेवट होणार आहे. त्यामुळे मालिकेचे प्रेक्षकसुद्धा नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच या मालिकेतील शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री पायल जाधवने सोशल मीडियावर एक पत्र लिहिलं आहे. तिच्या या पत्रावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘तमाम मराठी रसिक प्रेक्षकांना, सप्रेम नमस्कार. पत्रास कारण की, तुमची लाडकी श्री तुमचा निरोप घेत आहे. आपण अबीर गुलाल मालिकेला आणि सर्व पात्रांना भरभरून प्रेम दिलं. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. माझ्यावर विश्वास ठेवून संधी दिल्याबद्दल कलर्स मराठीचे आणि फोर लायन्स, फिल्म फार्म या निर्मिती संस्थांचे आभार. सातत्याने अथक मेहनत करून रोज नवीन भाग आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचे आभार. साकारलेली प्रत्येक भूमिका ही आपल्याला काहीना काही देऊन जाते. बहुतांश मालिकेत सत्याचा असत्यावर विजय होतो. मात्र त्या पलीकडे जाऊन श्री ने आपल्या न्यूनगंडाला थेट फाट्यावर मारायला शिकवलं. आपली माणसं जपण्यासाठी चार पावलं मागे येणारी, प्रसंगी ठामपणे उभी राहिलेली श्री तुम्हाला आवडली याचा मला फार आनंद आहे. मराठी मालिकांवर, कलाकृतींवर आपण भरभरून प्रेम कराल याची मला खात्री आहे. परत भेटूच. तोपर्यंत थांबायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची- “हाय अंबाबाईची साथ, तर कशाला उद्याची बात”, तुमची लाडकी श्री म्हणजेच पायल,’ अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

ही मालिका बंद होण्याविषयी अभिनेता अभिजीत केळकर एका मुलाखतीत म्हणाला, “आमचं शूटिंग कमाल सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच मालिका बंद होत असल्याचं कळालं. उरलेले काही दिवस आम्हाला कमाल घालवायचे आहेत. त्यामुळे काम करताना आमच्यात तीच एनर्जी आहे. धक्का तर बसला आहे. पण प्रत्येकाच्या बाजू आहेत. ती ती माणसं त्यांच्या त्यांच्या जागी योग्य असतात. पहिल्या वेळी खूप वाईट वाटतं. पण आता मला तितकं वाईट वाटत नाही. पण एक गोष्ट आहे की मला पुन्हा स्ट्रगल करावं लागेल.”